अर्जुना घाटात भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून

By Admin | Updated: August 24, 2015 00:02 IST2015-08-24T00:02:23+5:302015-08-24T00:02:23+5:30

चुलत भावाशी झालेल्या वादाची तक्रार पोलीस ठाण्यात देऊन परतणाऱ्या तरुणावर पत्नीसमोरच चाकूचे वार करून निर्घृण खून केल्याची घटना अर्जुना घाटात रविवारी भरदुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

Arjuna killer's bloodless murderous youth | अर्जुना घाटात भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून

अर्जुना घाटात भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून

पत्नीसमोर घडला थरार : पोलिसात तक्रार दिल्याचा वचपा
यवतमाळ/हिवरी : चुलत भावाशी झालेल्या वादाची तक्रार पोलीस ठाण्यात देऊन परतणाऱ्या तरुणावर पत्नीसमोरच चाकूचे वार करून निर्घृण खून केल्याची घटना अर्जुना घाटात रविवारी भरदुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. मारेकऱ्यांनी पोटावर आणि मांडीवर चाकूने १० ते १२ वार करून खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीला वाचविण्यासाठी पत्नीने मदतीची याचना केल्यानंतरही तासभर कुणीही धावून आले नाही.
अजित विनायक चव्हाण (३५) रा. माळम्हसोला असे मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी रात्री गावातील स्वस्त धान्य दुकानदार असलेला चुलत भाऊ राजेश बद्रू चव्हाण याच्यासोबत धान्य दरावरून अजितचा वाद झाला होता. या वादाची तक्रार देण्यासाठी अजित आपली पत्नी ललिता चव्हाणला सोबत घेऊन रविवारी दुपारी १२ वाजता यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात आला. या ठिकाणी तक्रार देऊन आपल्या दुचाकीने पती-पत्नी गावाकडे निघाले होते.
अर्जुना घाटातील पहिल्या वळणावरील गतिरोधकावर त्यांची दुचाकी पोहोचली. त्यावेळी वेग कमी होताच दबा धरुन बसलेल्या तिघांनी दुचाकीला धक्का देऊन दोघांनाही खाली पाडले. काही कळायच्या आत अजितवर चाकूने वार केले. सोबत असलेल्या पत्नीलाही मारहाण केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अजितला पाहून पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केली. सुमारे तासभर कुणीही मदतीसाठी धावून आले नाही. त्यानंतर या घटनेची माहिती कुणी तरी ग्रामीण पोलिसांना दिली. ग्रामीण पोलीस घटनास्थळावर पोहोचले तेव्हा अजित निपचित आढळून आला. त्याला शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी ललिता चव्हाणच्या तक्रारीवरून आरोपी राजेश बद्रू चव्हाण, विशाल ऊर्फ चिकू राजेश चव्हाण, प्रवीण पोटे, सचिन सुत्रावे सर्व रा. माळम्हसोला यांच्या विरोधात पोलिसांनी कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. विशाल व त्याच्या दोन साथीदारांनी रस्त्यात अडवून थेट हल्ला केला. या कटात राजेशने मदत केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना झाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने ग्रामीण पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. (कार्यालय प्रतिनिधी)
अजितवर होती पाळत
गावात झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात गेलेल्या अजित चव्हाणवर आरोपींनी पाळत ठेवली होती. तो कुठे जातो याची माहिती मिळवून मारेकरी अर्जुना घाटातील गतिरोधकासमोरील झुडूपामध्ये दबा धरुन बसले होते. त्याच्या प्रत्येक हालचालीची इत्थंभूत माहिती मारेकऱ्यांंना दिली जात होती. त्यामुळे या घटनेतील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलीस त्या दिशेनेही तपास करीत असून आरोपींच्या अटकेनंतर या घटनेचे रहस्य आणखी उलगडणार आहे.

Web Title: Arjuna killer's bloodless murderous youth