पंढरपूरसाठी विदर्भातून ८०० बसेस जाणार; ४८ कर्मचारी राहणार कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 04:01 PM2022-06-28T16:01:16+5:302022-06-28T16:04:24+5:30

संपूर्ण महाराष्ट्रातून ४७०० जादा बसेस सोडण्याचे नियोजन महामंडळाकडून करण्यात आले आहे. यात विदर्भाचा ८०० बसेसचा वाटा आहे.

800 buses from Vidarbha to Pandharpur; 48 employees will be on working | पंढरपूरसाठी विदर्भातून ८०० बसेस जाणार; ४८ कर्मचारी राहणार कार्यरत

पंढरपूरसाठी विदर्भातून ८०० बसेस जाणार; ४८ कर्मचारी राहणार कार्यरत

googlenewsNext

यवतमाळ :पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी विदर्भातून ८०० एसटी बसेस सोडल्या जाणार आहेत. यामध्ये नागपूर भागातील १०० आणि अमरावती भागातील ७०० जादा बसेसचा समावेश राहणार आहे. या भागातील वाहतुकीच्या नियंत्रणासाठी पर्यवेक्षकीय व इतर असे ४८ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. विविध आगारातून प्रवाशांची ने-आण करण्यासाठी महामंडळ सज्ज झाले आहे.

आषाढी यात्रेच्या माध्यमातून एसटीला मोठे उत्पन्न प्राप्त होते. या काळातील गर्दी ‘कॅश’ करण्याचा महामंडळाचा प्रयत्न असतो. कोरोनामुळे मागील दोन वर्षे या उत्पन्नाला मुकावे लागले. यावर्षी भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता महामंडळाकडून अतिरिक्त वाहतूक व्यवस्था केली जात आहे. कोरोना आणि कर्मचाऱ्यांचा संप यामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती गेल्या दोन वर्षांत अतिशय खराब झाली आहे.

प्रवासी संख्या वाढत जाईल, त्या प्रमाणात बसेस सोडल्या जाणार आहेत. शिवाय एखाद्या गावातून बस भरेल एवढे प्रवासी मिळाल्यास त्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. नागपूर आणि अमरावती या दोन्ही भागातील बसेस पंढरपूर येथे कुठे थांबतील, याचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे परतीच्या प्रवासाला निघणाऱ्या भाविकांसाठी सोयीचे होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून ४७०० जादा बसेस सोडण्याचे नियोजन महामंडळाकडून करण्यात आले आहे. यात विदर्भाचा ८०० बसेसचा वाटा आहे. या प्रदेशातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यवेक्षकीय व इतर कर्मचारी ५ जुलैपासून नियुक्त करण्यात येणार आहेत. वाहतूक नियंत्रक, सहायक वाहतूक निरीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक अधीक्षकांची कामगिरी याकरिता लावण्यात आलेली आहे. नागपूर प्रदेशातील यवतमाळ, वर्धा आणि नागपूर विभागातून २७ तर अमरावती भागातून अमरावती, बुलडाणा आणि अकोला विभागातून २१ कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश राहणार आहे.

तपासणी नाक्यावर २२ कर्मचारी

यात्रा कालावधीत ठिकठिकाणी तपासणी नाके कार्यरत असणार आहेत. यासाठी नागपूर व अमरावती विभागातील २२ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. यामध्ये सहायक वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रक असतील. दरम्यान, यात्रेसाठी जादा बसेस सोडल्या जाणार असल्याने स्थानिक पातळीवरील कमी उत्पन्न देणाऱ्या बसफेऱ्या कमी केल्या जाणार आहेत.

Web Title: 800 buses from Vidarbha to Pandharpur; 48 employees will be on working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.