टिकैत आलेच नाही, २५ समर्थक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:00 AM2021-02-21T05:00:00+5:302021-02-21T05:00:12+5:30

कोरोनाचा वाढता प्रभाव आणि सभेला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने राकेश टिकैत यांच्या शनिवार २० फेब्रुवारी रोजी येथील आझाद मैदानात होणाऱ्या महापंचायत-सभेला परवानगी नाकारली. त्यानंतरही आयोजक संयुक्त किसान मोर्चाने कोणत्याही परिस्थितीत टिकैत यांची सभा होणारच, पाहिजे तर आमच्यावर गुन्हे दाखल करा, अशी भूमिका घेतली.

25 supporters detained | टिकैत आलेच नाही, २५ समर्थक ताब्यात

टिकैत आलेच नाही, २५ समर्थक ताब्यात

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची जाहीर सभा : आझाद मैदानात तगडा पाेलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे प्रमुख नेते राकेश टिकैत यांची अखेर शनिवारी यवतमाळातील आझाद मैदानात होणारी सभा पोलिसांनी परवानगी नाकारल्याने रद्द करावी लागली. टिकैत या सभेसाठी आलेच नाही. मात्र दिल्लीहून आलेल्या त्यांच्या २५ समर्थकांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले. 
कोरोनाचा वाढता प्रभाव आणि सभेला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने राकेश टिकैत यांच्या शनिवार २० फेब्रुवारी रोजी येथील आझाद मैदानात होणाऱ्या महापंचायत-सभेला परवानगी नाकारली. त्यानंतरही आयोजक संयुक्त किसान मोर्चाने कोणत्याही परिस्थितीत टिकैत यांची सभा होणारच, पाहिजे तर आमच्यावर गुन्हे दाखल करा, अशी भूमिका घेतली. कोरोनाचे नियम पाळून परवानगी द्यावी, ते शक्य नसेल तर किमान ऑनलाईन सभेला परवानगी देण्याची मागणी केली. त्यासाठी शनिवारी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्याशी चर्चा केली. मात्र सभेबाबत सर्वत्र झालेला व्यापक प्रचार-प्रसार लक्षात घेता किती गर्दी होऊ शकते याचा  संभाव्य आकडाच पुढे ठेवून भुजबळ यांनी ही सभा झाल्यास ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली आणि या सभेचा आग्रह सोडण्याचे आवाहन आयोजकांन केले. अखेर लोकहित लक्षात घेऊन परवानगीअभावी ही सभा रद्द करण्यात आली. राकेश टिकैत येऊ शकले नसले तरी त्यांचे दिल्ली व नागपुरातील २५ समर्थक यवतमाळात पोहोचले. त्यांना आझाद मैदानातून ताब्यात घेण्यात आले. या सभेसाठी इतरही भागातून शेतकरी व समर्थक आले होते. मात्र त्यांना निराश होऊन परतावे लागले. 
सभा उधळण्याची हूरहूर
दरम्यान, राकेश टिकैत यांची आझाद मैदानातील सभा राजकीय विरोधकांकडून उधळली जाण्याची आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती पोलिसांना होती. त्यामुळे जिल्हाभरातून अतिरिक्त पोलीस कुमक यवतमाळात बोलावून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नागपूर रोडवर तैनात करण्यात आली होती. आझाद मैदानाला तर जणू पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. टिकैत समर्थकांना गावाच्या वेशीवरच रोखण्यासाठी नागपूर, पांढरकवडा रोडवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

‘त्या’ फोनचे रहस्य कायम
 यवतमाळात आल्यास १४ दिवस क्वाॅरंटाईन रहावे लागेल, असा फोन पोलिसांकडून राकेश टिकैत यांना केला गेला. त्यामुळेच ते आले नसल्याची चर्चा आहे. मात्र या फोनचे रहस्य कायम आहे. स्थानिक आयोजक सिकंदर शहा यांनी अशा फोनची शक्यता ‘लोकमत’शी बोलताना फेटाळली. 
 

Web Title: 25 supporters detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.