दोन दिवसाच्या पावसाने धरणांच्या पाणीपातळीत वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:54 IST2019-07-09T13:53:59+5:302019-07-09T13:54:31+5:30
वाशिम : जिल्ह्यात ७ आणि ८ जुलै या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत किंचीतशी वाढ झाली.

दोन दिवसाच्या पावसाने धरणांच्या पाणीपातळीत वाढ!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात ७ आणि ८ जुलै या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत किंचीतशी वाढ झाल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी सोमवारी दिली.
जिल्ह्यात ३ मध्यम आणि १३१ लघू असे एकंदरित १३४ सिंचन प्रकल्प आहेत. चालूवर्षीच्या उन्हाळ्यात त्यातील १२० पेक्षा अधिक प्रकल्प पूर्णत: कोरडे; तर उर्वरित प्रकल्पांमध्ये केवळ मृत जलसाठा शिल्लक राहिला. यामुळे जिल्हाभरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. दरम्यान, पावसाळ्यात चांगला पाऊस होवून सर्व प्रकल्पांची पाणीपातळी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र पूर्ण जून महिना दमदार पावसाशिवाय उलटल्यानंतर जुलै महिन्यातही परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झालेली नव्हती. गत दोन दिवसाच्या पावसामुळे मात्र काहीठिकाणच्या धरणांमध्ये पाणीसाठा झाला आहे. असे असले तरी त्याने कुठलाही विशेष फरक पडणार नसून धरणे भरण्याकरिता संततधार तथा मोठ्या स्वरूपातील पावसाची नितांत गरज असल्याची माहिती कार्यकारी अभियंता बोरसे यांनी दिली.