शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 06:53 IST2026-01-14T06:52:43+5:302026-01-14T06:53:06+5:30
व्हिडीओ व्हायरल; राज्यभरात संताप

शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
मंगरुळपीर (वाशिम): तालुक्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी दोन वर्षापूर्वी मनरेगा योजनेंतर्गत तीन एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान चार महिन्यांपासून रखडल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान, मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे गोगरी शिवारात पाहणीसाठी गेले असता, पवार यांनी त्यांच्याकडे अनुदानाबाबत विचारणा केली. आरोपानुसार, जाब विचारत असताना तालुका कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या अंगावर धाव घेत बुटाने मारहाण केली. याशिवाय, मातीची ढेकळे उचलून मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तुला गुन्ह्यात अडकवतो अशी दिली धमकी
या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्याने शेतकऱ्याला 'तुला गुन्ह्यात अडकवीन' अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. घटनेची माहिती परिसरात पसरताच शेतकरी संघटनांचे पदधिकारी व स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र निषेध नोंदविला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोर्षीवर कडक कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी संघटनांनी केली आहे.
व्हिडीओ व्हायरल
तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी शेतकरी ऋषिकेश पवार यांना बुटाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये शेतकऱ्याला बुटाने मारहाण होत असल्याचे दृश्य दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
एक व्यक्ती महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर धावली. तो संबंधित शेतकरीही नव्हता. परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मी अंगावर धावलो असलो, तरी मारहाण अजिबात केलेली नाही. माझ्यावरील आरोप पूर्णतः खोटे आहेत- सचिन कांबळे, तालुका कृषी अधिकारी