मंगरुळपीरचे ग्रामीण रुग्णालय वार्‍यावर

By Admin | Updated: August 21, 2014 00:29 IST2014-08-20T22:57:46+5:302014-08-21T00:29:04+5:30

येथे ग्रामीण रुग्णालय ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णाचे प्रचंड हाल होत आहेत

Warpur village Rural Hospital | मंगरुळपीरचे ग्रामीण रुग्णालय वार्‍यावर

मंगरुळपीरचे ग्रामीण रुग्णालय वार्‍यावर

मंगरुळपीर: शहरी तथा ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतुने शासनाने लाखो रुपये खर्च करुन मंगरुळपीर येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली. मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णाचे प्रचंड हाल होत आहेत.
गोरगरीब रुग्णाला खाजगी दवाखान्याचा महागडा खर्च परवडत नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी हा दृष्टीकोन लक्षात घेवून गेली १५ वर्षापूर्वी येथे ३0 खाटाचे भव्य ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभारण्यात आली. मात्र सद्यस्थितीत येथे उपलब्ध एक्स-रे मशीन, बेबी केअर युनिट व बहुतांश आरोग्य यंत्रणा बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे रुग्णाला याचा फायदा होत नाही. उपलब्ध औषधीवर समाधान मानावे लागते. एवढेच नव्हे तर या ठिकाणी गत वर्षापासून वैद्यकीय अधिक्षक पद रिक्त आहे. तर वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहेत. तीन महिन्यांपासून जिल्हास्थळी रेफर करण्याशिवाय पर्याय नाही. साप चावणे, अपघात किंवा विष प्राशन केलेला रुग्ण रुग्णालयात आल्यास त्याची काय स्थिती होईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय शोभेची वास्तू ठरत आहे.
या रुग्णालयात आंतररुग्ण विभाग असून तीस खाटा असूनही मोजक्याच खाटावर रुग्ण आढळून येतात. याशिवाय हाणामारीच्या घटनेत संबंधित व्यक्तीचे वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असते. मात्र वैद्यकीय अधिकारी नसल्याने इतर तालुक्यात वैद्यकीय तपासणीसाठी घेउन जावे लागते. यामध्ये पोलीस यंत्रणेला त्रास होत आहे. या रुग्णालयात विविध सुविधांचा अभाव असल्याने शासनाच्या उद्देशाला तडे जात आहे. या ठिकाणी आयुश विभागातील वैद्यकीय अधिकार्‍यावर रुग्णालयाची जबाबदारी येउन ठेपल्याने त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयाला अनेक समस्यांनी घेरले आहे. त्यामुळे अनेकांना नाईलाजास्तव खाजगी दवाखान्याकडे धाव घ्यावी लागत आहे. रुग्णालयात तात्काळ वैद्यकीय अधिकारी अधिक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी जनतेत जोर धरत आहे.

Web Title: Warpur village Rural Hospital