बैलगाडीसह 2 शेतकरी पाण्यात कोसळले, गावकऱ्यांनी धाव जीव घेऊन वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 15:38 IST2018-07-28T15:36:46+5:302018-07-28T15:38:37+5:30
पावसाच्या पाण्यामुळे वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लघू प्रकल्प तुडूंब भरला असून, धरणाच्या बुडीत क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर तीन फूट पाणी आले आहे. शुक्रवारी या पुलावरून शेतात जाताना एका बैलगाडी दोन शेतकऱ्यांसह पाण्यात कोसळली.

बैलगाडीसह 2 शेतकरी पाण्यात कोसळले, गावकऱ्यांनी धाव जीव घेऊन वाचवले
वाशिम : पावसाच्या पाण्यामुळे वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लघू प्रकल्प तुडूंब भरला असून, धरणाच्या बुडीत क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर तीन फूट पाणी आले आहे. शुक्रवारी या पुलावरून शेतात जाताना एका बैलगाडी दोन शेतकऱ्यांसह पाण्यात कोसळली. उपस्थितांनी धावाधाव करीत बैल व शेतकऱ्यांना वाचविले. पण, आतातरी जलसिंचन विभाग या घटनेकडे गांर्भीयाने लक्ष देणार का? असा प्रश्न सुरकंडी परिसरातील नागरिकांनी विचारला आहे.
सुरकंडी येथील लांडकदरा शेतशिवारात सन २००७-२००८ मध्ये लघू प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. तब्बल दहा वषार्नंतरही धरणाचे काम पूर्णत्वाकडे आले नाही. यावर्षींच्या दमदार पावसामुळे लघुप्रकल्प तुडूंब भरला असून, या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील शेतशिवारातून मागील बाजुने वाशिमकडून येणारा रस्ता आहे. या रस्त्यावर सुरकंडी गावालगतच्या कमी उंचीच्या पुलावर तीन फूट पाणी आले आहे. त्यामुळे परिसरातील गावांमधील लोकांचा वाशिम शहराशी संपर्क तुटला आहे. सद्यस्थितीत सुरकंडी येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने दिवसभर शेतकरी, महिला व गुरेढोरे याच पुलावरून जिवघेणा प्रवास करीत आहेत. पुलावर जास्त पाणी आल्यामुळे पुलाचे कठडेही पाण्यात बुडाले आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुरकंडी येथील बळीराम पंढरी जाधव या शेतकऱ्याची बैलगाडी पुलावरून मार्गक्रमण करताना गाडी जास्त पाण्यात गेल्यानंतर बैल बुडाल्यामुळे गाडी सैरवैर होऊन पुलाखाली कोसळून पाण्यात बुडाली. या गाडीसोबत दोन पुरुष व दोन बैलही बुडाले. ही घटना वाऱ्यासारखी गावशिवारात पसरली आणि तीनशे लोकांचा जमाव घटनास्थळी जमला. शेवटी अथक परिश्रमानंतर पुरूष व बैलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. यामध्ये एका बैलाला जबर मार लागला तर बैलगाडीत असलेले युरिया खताचे सात पोते पाण्यात बुडाल्यामुळे जाधव यांचे सात हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेनंतर शनिवारी सकाळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन भोयर व तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष मुन्नाभाई भवाणीवाले यांच्या पुढाकाराने पुलावरील रस्ता ओळखून येण्यासाठी पुलाच्या दोन्हीकडील कठड्यांना झेंडे लावण्यात आले.