शौचालय बांधकामाचे प्रस्ताव धूळ खात कारवाईची मागणी

By Admin | Updated: December 3, 2014 01:33 IST2014-12-03T01:33:54+5:302014-12-03T01:33:54+5:30

उदासीन ग्रामविकास अधिका-यांवर कडक कारवाईची मागणी.

Toilets construction proposal demanded action against dust | शौचालय बांधकामाचे प्रस्ताव धूळ खात कारवाईची मागणी

शौचालय बांधकामाचे प्रस्ताव धूळ खात कारवाईची मागणी

शिरपूर जैन (वाशिम) : शासनाच्या हगणदरीमुक्त मोहिमेंतर्गत २८ लाभार्थींचे शौचालय बांधकामासाठी आलेले प्रस्ताव सात महिन्यांपासून ग्राम विकास अधिकार्‍याने वरिष्ठ पातळीवर पाठविलेच नसल्याने लाभार्थ्यांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्राम पंचायतच्या तीन सदस्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. शासनाच्या निर्मलग्राम स्वच्छता अभियान तसेच हगणदरीमुक्त गाव मोहिमेअंतर्गत मे २0१४ मध्ये शौचालय बांधकाम अनुदानासाठी शिरपूर ग्राम पंचायत अंतर्गत अर्ज मागविण्यात आले होते. त्यावेळी २८ लाभार्थ्यांनी शिरपूर ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे शौचालयासाठी अर्ज सादर केले होते. पुढील कार्यवाहीसाठी ग्रामविकास अधिकार्‍याला हे अर्ज मालेगाव पंचायत समितीकडे पाठविणे क्रमप्राप्त होते; परंतु २८ जणांचे अर्ज अद्यापही पंचायत समितीकडे पाठविण्यात आले नाही. त्यामुळे एक प्रकारे शासनाच्या हागणदरीमुक्त गाव मोहिमेसाठी ग्राम विकास अधिकारीच उदासीन असल्याने गावात होणार्‍या घाणीमुळे शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेचा बोजवारा उडाला आहे. अशा उदासीन ग्रामविकास अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिरपूर ग्रामपंचायतचे सदस्य कुंडलीक चोपडे, भगवान धिरके व दुर्गाबाई अढागळे यांनी १ डिसेंबर रोजी मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Toilets construction proposal demanded action against dust