कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 00:40 IST2025-09-09T00:40:03+5:302025-09-09T00:40:53+5:30
या दुहेरी मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे...

कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी गावात सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मानसिक अस्वस्थतेने त्रस्त असलेल्या ४१ वर्षीय पतीने पत्नीचा लोखंडी विळ्याने निर्घृण खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुहेरी मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
कैलास महादेव धोंगडे यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा लहान भाऊ हिंमत महादेव धोंगडे (वय ४१) हा पत्नी कल्पना हिंमत धोंगडे (वय ३४), दोन मुली व एका मुलासह शेजारी स्वतंत्र राहत होता. हिंमत याला दारूचे व्यसन होते. शिवाय मागील तीन वर्षांपासून तो मानसिक अस्वस्थतेच्या झटक्याने वागत असल्याने वाशिम येथील एका डॉक्टराकडे त्याच्यावर उपचार सुरू होते.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून हिंमतचा त्रास अधिकच वाढला होता. त्यामुळे ८ सप्टेंबर रोजी दुपारी त्याला दवाखान्यात नेण्याचे ठरले. त्यासाठी दुपारी १२ वाजता ऑटो घरासमोर आणण्यात आला. मात्र, वाहन पाहताच हिंमतने घराचा दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने घरातून कल्पना धोंगडे यांचा आरडाओरडाचा आवाज ऐकू आला. शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहिले असता कल्पना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. यानंतर हिंमतनेही घरातील नाटीला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिस घटनास्थळी दाखल
गावकऱ्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. मंगरूळपीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता, कल्पना धोंगडे मृतावस्थेत आढळून आल्या तर हिंमत धोंगडे गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. प्राथमिक तपासात हिंमतने लोखंडी विळ्याने पत्नीच्या डोक्यावर वार करून तिचा खून केला व नंतर स्वतः आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले.
दोन मुली, एक मुलगा झाला पोरका
धोंगडे दाम्पत्याला दोन मुली (मोठी ११, दुसरी ९ वर्षांची) आणि लहान ७ वर्षाचा मुलगा आहे. सोमवारच्या दुर्दैवी घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्याने दोन मुली, एक मुलगा पोरका झाला आहे.