पिंपळशेंडा, कवरदरी जि.प. शाळेच्या शिक्षकांना तेराचा पाढाही आला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 18:53 IST2019-08-14T18:53:01+5:302019-08-14T18:53:06+5:30
काही शाळेच्या शिक्षकांनाच पाढे, इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग येत नसल्याचे धक्कादायक वास्तवही आहे.

पिंपळशेंडा, कवरदरी जि.प. शाळेच्या शिक्षकांना तेराचा पाढाही आला नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
यशवंत हिवराळे
राजूरा (वाशिम) : एकिकडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यशाचे एकेक टप्पे गाठत आहेत, तर दुसरीकडे काही शाळेच्या शिक्षकांनाच पाढे, इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग येत नसल्याचे धक्कादायक वास्तवही आहे. मालेगावचे गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे यांनी बुधवारी पिंपळशेंडा, कवरदरी या दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांना भेट दिली असता, काही शिक्षकांना तेराचा पाढा तसेच ब्यूटीफुलचे स्पेलिंग आले नाही.
खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक दर्जा फारसा सरस नसतो, अशी ओरड नेहमीच होत असते. पूर्वीच्या तुलनेत आता जिल्हा परिषद शाळांमध्येही बºयाच अंशी भौतिक सुविधा उपलब्ध होत आहेत तर शिक्षकदेखील बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीने शिक्षणाचे धडे देत आहेत. परंतू, काही शाळांमधील शिक्षक मात्र शिक्षणासंदर्भात अजूनही गंभीर नसल्याचे वास्तव बुधवारी गटशिक्षणाधिकाºयांनी दिलेल्या भेटीदरम्यान समोर आले. कवरदरी, पिंपळशेंडा जिल्हा परिषद शाळेतील काही शिक्षकांना तेराचा पाढा म्हणायला सांगितले असता, शिक्षकांना हा पाढा आला नाही तसेच काही शिक्षकांना ब्यूटीफुलचे स्पेलिंगही आले नाही. यांसदर्भात गटशिक्षणाधिकाºयांना सूचना दिल्या असून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही गटविकास अधिकारी कांबळे यांनी दिल्या.