दोन चिमुकल्यांसह मातेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

By Admin | Updated: September 28, 2014 23:43 IST2014-09-28T23:26:03+5:302014-09-28T23:43:11+5:30

खामगाव तालुक्यातील खोलखेड येथील घटना.

Suicide by taking a plunge in the well along with two sparrows | दोन चिमुकल्यांसह मातेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

दोन चिमुकल्यांसह मातेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

खामगाव (बुलडाणा): घरगुती वादातून एका मातेने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेवून आत्मह त्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी खामगाव तालुक्यातील खोलखेड शिवारात घडली.
लोहार काम करणारे सुभाष सोळंके, त्यांची पत्नी मंगला, तसेच राजनंदिनी आणि सोपान या दोन मुलांचं कुटुंब गत चार ते पाच वर्षांंपासून खामगाव तालुक्यातील खोलखेड येथे वास्तव्यास होते. रविवारी या कुटुंबातील सौ.मंगला सोळंके (वय २२) हिने राजनंदिनी (वय ३ वर्ष) आणि दीड वर्षाचा मुलगा सोपान यांना घेऊन खोलखेड शिवारातील एका विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. सुरेशसिंह राजपूत यांच्या कुटुंबातील सदस्य शेतात गेले असता, ही घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती जलंब पोलिस स्टेशनला दिल्यानंतर, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ५५ फूट खोल आणि २0 फूट पाणी असलेल्या या विहिरीतील पाणी उपसल्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल पांडूरंग मिसाळ, दिनकर चंदन यांच्यासह गजेंद्रसिंग राजपूत, हरिदास जमेवार यांनी विहिरीत उतरुन लाकडी खाटेच्या सहाय्याने दोन्ही चिमुकल्यांसह त्यांच्या मातेचा मृतदेह विहिरीबाहेर काढले. घरगुती वादातून विवाहितेने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. याआधी हे कुटुंब जलंब येथे राहत होते. त्यावेळीही सौ. मंगलाने असाच प्रयत्न केला होता. या प्रकरणी जलंब पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Suicide by taking a plunge in the well along with two sparrows