कोणी एक रुपयाचे नाणे गिळतो, कोणाच्या नाकात शेंगदाणा, तर कोणाच्या कानात मणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST2021-09-09T04:49:17+5:302021-09-09T04:49:17+5:30

वाशिम : लहान मुले कधी काय करतील याचा नेम नाही. कोणी एक रुपयाचे नाणे गिळतो, कोणाच्या नाकात शेंगदाणा तर ...

Someone swallows a rupee coin, a peanut in someone's nose, a bead in someone's ear! | कोणी एक रुपयाचे नाणे गिळतो, कोणाच्या नाकात शेंगदाणा, तर कोणाच्या कानात मणी!

कोणी एक रुपयाचे नाणे गिळतो, कोणाच्या नाकात शेंगदाणा, तर कोणाच्या कानात मणी!

वाशिम : लहान मुले कधी काय करतील याचा नेम नाही. कोणी एक रुपयाचे नाणे गिळतो, कोणाच्या नाकात शेंगदाणा तर कोणाच्या कानात मणी, छर्रा अडकतो. यासाठी मग डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. गत वर्षभरात असे ४० प्रकार घडले आहेत.

लहान मुलांची काळजी घेणे ही पालकांसाठी मोठी कसरत आहे. पालकही वेळोवेळी पाल्यांची काळजी घेतात; परंतु या काळजीत थोडी जरी ढिलाई आली आणि मुलाच्या हाती काही साहित्य पडले तर ते कान, कान, तोंडात टाकण्याचा प्रयत्न करतात. कोणी एक रुपयाचे नाणे गिळण्याचा प्रयत्न केल्याने ते घशात अडकले, कोणी नाकात शेंगदाणा घालण्याचा प्रयत्न केला तर कोणाच्या कानात मणी, छर्रा अडकल्याचे कान, नाक, घसा तज्ज्ञांच्या तपासणीतून समोर आले. काही जणांवर शस्त्रक्रिया करावी लागली तर काही जणांच्या कान, नाक, घशातील साहित्य योग्यरीत्या बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले.

०००००

मुले काय करतील याचा नेम नाही

१) वाशिम शहरातील सिव्हिल लाइन भागातील एका पाच वर्षीय मुलाने एक रुपयाचे नाणे गिळण्याचा प्रयत्न केला.

२) रिसोड येथील एका ७ वर्षाच्या मुलीने नाकात शेंगदाणा घालण्याचा प्रयत्न केला.

३) वाशिम शहरातीलच एका ४ वर्षाच्या मुलाने कानात पेन्सिल घालण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने पुढील अनर्थ टळला.

०००००००

अशी घ्या मुलांची काळजी

सहा वर्षाआतील मुलांना शक्यतोवर एकटे सोडू नका.

मुलाच्या आसपास सेफ्टी पिन, नाणे, गहू, शेंगदाणा, मणी, छर्रा यांसह अन्य साहित्य ठेवू नका.

मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवावे.

०००००

वर्षभरात १० शस्त्रक्रिया

गत वर्षभरात जिल्ह्यात नाणे गिळणे, शेंगदाणा, मणी, छर्रा व अन्य साहित्य नाक किंवा कानात टाकणे असे प्रकार मुलांकडून घडल्याने खासगी कान, नाक, घसा तज्ज्ञांकडे १० शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात कान, नाक, घसा तज्ज्ञाचे पद रिक्त असल्याने तेथे शस्त्रक्रिया होऊ शकली नाही.

००००

कोट

सहा वर्षाआतील मुलांना विशेष जपावे लागते. कुणी नाणे गिळतो तर कुणी नाक व कानात एखादे साहित्य, वस्तू टाकण्याचा प्रयत्न करतो. एखाद्यावेळी शस्त्रक्रिया करून संबंधित वस्तू, साहित्य काढावे लागते. घरात शक्यतोवर असे साहित्य मुलांच्या हाती पडणार नाही, याची दक्षता पालकांनी घ्यावी.

- डॉ. संतोष बेदरकर

कान, नाक, घसा तज्ज्ञ, वाशिम.

Web Title: Someone swallows a rupee coin, a peanut in someone's nose, a bead in someone's ear!