Small landholder farmers get retirement pay! | अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार निवृत्ती वेतन! नाव नोंदणीसाठी विशेष मोहीम
अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार निवृत्ती वेतन! नाव नोंदणीसाठी विशेष मोहीम

वाशिम - प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत १८ ते ४० वयोगटातील २ हेक्टर पर्यंत शेती असलेल्या सर्व अल्पभूधारक व सिमांत शेतकऱ्यांना वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर ३ हजार रुपये प्रतिमाह निवृत्ती वेतन मिळणार आहे. यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी २२ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०१९ दरम्यान जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जाणार आहे.    

प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पीएम-केएमडीवाय) संपूर्ण देशात सुरू करण्यात आली आहे. ही एक योजना एैच्छिक व अंशदान पेन्शन योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्याला भारतीय जीवन बिमाद्वारे निवृत्ती वेतन दिले जाणार आहे. १ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असून त्यांना वयानुसार प्रतिमाह ५५ ते २०० रुपये रक्कम जमा करावी लागेल. सदर रक्कम ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. यात केंद्र शासनाकडून सुध्दा लाभार्थ्याद्वारे जमा केलेल्या रकमेऐवढी रक्कम जमा करण्यात येईल. गाव पातळीवर सुविधा केंद्रामध्ये (कॉमन सर्व्हिस सेंटर) लाभार्थी नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी करतेवेळी कोणतीही रक्कम लाभार्थीने भरण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १६८ शेतक-यांनी नोंदणी केली आहे.

नोंदणीनंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून लाभार्थी हिश्याची रक्कम ऑटो-डेबीटने विमा कंपनीकडे जमा होईल. या योजनेत समाविष्ट होण्यासाठी शेतक-यांनी आधारकार्ड, गाव नमुना ८ अ व बँक पासबुक, बँक खाते क्रमांक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव इत्यादी माहिती सोबत आणणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचे पेन्शन कार्ड मिळणार आहे. शेतक-यांची पडताळणी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीद्वारे होणार आहे. अल्पभूधारक व सिमांत शेतकरी (पती, पत्नी) वेगवेगळ्या पध्दतीने यात सहभागी होवू शकतात. वयाचे ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोघांनाही प्रतीमाह ३ हजार रुपये वेगवेगळ्या स्वरूपात प्रदान केले जाईल. ज्या शेतक-यांनी ही योजना काही कारणास्तव बंद केली किंवा अर्धवट सोडली, अशा शेतक-यांना त्यांनी जमा केलेली रक्कम व्याजासहीत परत दिली जाईल. इच्छुक शेतक-यांनी याबाबत सुविधा केंद्राशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी केले.

लाभार्थीचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटूंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची सुद्धा तरतुद या योजनेत आहे. या योजनेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी २२ आॅगस्ट ते २६ आॅगस्ट २०१९ दरम्यान जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जाणार असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांनी या योजनेसाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मोडक यांनी केले.


Web Title: Small landholder farmers get retirement pay!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.