वाशिम जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना ‘फायर ऑडिट’चा विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 11:17 AM2021-01-11T11:17:05+5:302021-01-11T11:19:22+5:30

Washim Hospital News गत दोन वर्षांपासून जवळपास ७० टक्के खासगी रुग्णालयांनी ‘फायर ऑडिट’कडे पाठ फिरविल्याचे समोर आले. 

Private hospitals in Washim district forget about fire audit | वाशिम जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना ‘फायर ऑडिट’चा विसर!

वाशिम जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना ‘फायर ऑडिट’चा विसर!

Next
ठळक मुद्दे जिल्ह्यात नोंदणीकृत २०० खासगी रुग्णालये आहेत.शहरातील केवळ ३२ रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले आहे. उर्वरीत ९२ रुग्णालयांनी फायर ऑडिट केले नाही.

- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : भंडारा येथील दुर्दैवी घटनेनंतर वाशिम  जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांचा ‘फायर ऑडिट’चा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रविवारी ‘लोकमत’ने रिअ‍ॅलिटी चेक केले असता गत दोन वर्षांपासून जवळपास ७० टक्के खासगी रुग्णालयांनी ‘फायर ऑडिट’कडे पाठ फिरविल्याचे समोर आले. 
भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता कक्षाला शनिवार, ९ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत दहा अर्भकांचा वेदनादायी मृत्यू झाला. तीन नवजात होरपळून मरण पावले तर सात जणांचा गुदमरून अंत झाला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांतील फायर ऑडिट व अग्निरोधक सिलिंडरची परिस्थिती नेमकी कशी आहे, यासंदर्भात रविवारी ‘रिअ‍ॅलिटी चेक’ केले असता जवळपास ७० टक्के खासगी रुग्णालयांचे गत दोन वर्षांत ‘फायर ऑडिट’च झाले नसल्याचे समोर आले. जिल्ह्यात नोंदणीकृत २०० खासगी रुग्णालये आहेत. यामध्ये सर्वाधिक १२४ रुग्णालये वाशिम शहरातील आहेत. शॉट सर्किटमुळे आगीची घटना घडू नये म्हणून दरवर्षी फायर ऑडिट करणे अनिवार्य आहे. वाशिम शहरातील केवळ ३२ रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले तर उर्वरीत ९२ रुग्णालयांनी फायर ऑडिट केले नाही. फायर ऑडिटसंदर्भात नगर परिषदेने रुग्णालय प्रशासनाला यापूर्वीच नोटीसही बजावल्या. परंतू, रुग्णालयांनी ही बाबही गांभीर्याने घेतली नाही.   
रिसोड शहरात जवळपास १८ नोंदणीकृत खासगी रुग्णालये असून, गत दोन वर्षांत एकाही रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याचे नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने स्पष्ट केले. मंगरूळपीर शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही अशीच काहीशी परिस्थिती आहे. मालेगाव शहरातील नोंदणीकृत १० पैकी चार रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले नसल्याची माहिती आहे. कारंजा शहरासह तालुक्यात नोंदणीकृत २५ पैकी जवळपास ८ रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा अद्ययावत नाही. अद्ययावत अग्निशमन यंत्रणा नसलेल्या जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये शॉट सर्किट किंवा अन्य कारणांमुळे आग लागल्यास यावर नियंत्रण कसे मिळविणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 

रिसोड येथे ‘फायर ऑडिट’च नाही
रिसोड शहरातील खासगी रुग्णालयांमधील ‘फायर ऑडिट’संदर्भात नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाकडून माहिती घेतली असता, गत दोन वर्षात एकाही रुग्णालयाने फायर ऑडिटबाबत प्रस्ताव पाठविला नाही. दोन वर्षांपूर्वी फायर ऑडिटबाबत खासगी रुग्णालय प्रशासनाशी पत्रव्यवहार करून ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या; परंतू रुग्णालयांनी फायर ऑडिट केले नाही, असे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, सोमवार ११ जानेवारीपासून फायर ऑडिटबाबत रुग्णालयांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी स्पष्ट केले.


खासगी रुग्णालयांमधील फायर ऑडिट व अग्निरोधक सिलिंडर याबाबत सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. या विषयाच्या अनुषंगाने लवकरच जिल्हास्तरावर आढावा घेण्यात येणार आहे. फायर ऑडिट व अग्निरोधक सिलिंडर यासंदर्भात टाळाटाळ, दिरंगाई करणाऱ्याविरुद्ध शासन नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
- शण्मुगराजन एस.
जिल्हाधिकारी वाशिम


वाशिम शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांनी फायर ऑडिट केले आहे. आगीच्या संभाव्य घटना घडू नयेत तसेच आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळावे म्हणून खासगी रुग्णालयांनी ‘फायर ऑडिट’ तातडीने करावे तसेच अग्निरोधक सिलिंडर व्यवस्था अद्ययावत ठेवावी, याबाबत डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली आहे. 
- डॉ. अनिल कावरखे
जिल्हाध्यक्ष, आयएमए, वाशिम 

Web Title: Private hospitals in Washim district forget about fire audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.