बंडखोरांची नाराजी काढताना पक्षश्रेष्ठींची होतेय दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:11 IST2019-10-07T14:11:13+5:302019-10-07T14:11:19+5:30

बंडखोरांची नाराजी काढताना अधिकृत उमेदवारांसह पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक होत आहे.

Party leader try to canvasing rebels in Washim | बंडखोरांची नाराजी काढताना पक्षश्रेष्ठींची होतेय दमछाक

बंडखोरांची नाराजी काढताना पक्षश्रेष्ठींची होतेय दमछाक

- संतोष वानखडे  
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विधानसभा निवडणुकीत तिनही मतदारसंघात स्वपक्षातील तसेच मित्रपक्षातील दिग्गजांनी बंडखोरीचा पावित्रा घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. बंडखोरीमुळे ऐनवेळी कोणताही दगाफटका बसू नये म्हणून बंडखोरांची मनधरणी केली जात आहे. बंडखोरांची नाराजी काढताना अधिकृत उमेदवारांसह पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक होत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. तिनही मतदारसंघात स्वपक्षातील व मित्रपक्षातील दिग्गजांनी अधिकृत उमेदवारविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने प्रमुख पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि मित्रपक्षातील काही गटांची नाराजी ही डोकेदुखी वाढविणारी बाब ठरत असल्याने या नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी अधिकृत उमेदवारांसह पक्षश्रेष्ठीकडून प्रयत्न केले जात आहेत. रिसोड मतदारसंघात काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख व भाजपाचे माजी आमदार अ‍ॅड. विजयराव जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेस तसेच भाजपा, सेना महायुतीत उभी फुट पडल्याचे चित्र आहे. दिग्गज उमेदवारांची बंडखोरी पक्षाला महागात पडू शकते ही बाब हेरून पक्ष श्रेष्ठींकडून मनधरणी केली जात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत असंतुष्टांची नाराजी कायम राहते की मनोमिलन होते, यावर लढतीचे पुढील चित्र अवलंबून राहणार आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नीलेश पेंढारकर, काँग्रेसचे माजी आमदार सुरेश इंगळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून महायुती तसेच स्वपक्षाच्या उमेदवाराविरूद्ध बंडाचे निशान फडकाविले आहे. या दोघांनाही शांत करण्याचे प्रयत्न सुरू असून, यामध्ये यश येण्याची शक्यता कमीच असल्याची चर्चा राजकीय गोटातून ऐकायला मिळत आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघात ऐनवेळी माजी आमदार प्रकाश डहाके यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्याने जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे समर्थकांमधून प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. ठाकरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून सुरू आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत नाराजी दूर होईल, असा दावा केला जात असला तरी समर्थक आक्रमक असल्याने नाट्यमय घडामोडीची शक्यता वर्तविली जात आहे. एकंदरीत तिनही मतदारसंघातील बंडखोरांची भूमिका निवडणुकीतील लढतीचे पुढील चित्र ठरविण्यात महत्त्वाची मानली जात आहे. युती, आघाडी व पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका बसू नये म्हणून नाराज नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांना कुरवाळण्याचा प्रयत्न होत आहे. पक्षांतर्गतचे असंतुष्ट आणि मित्रपक्षातील नाराज मंडळीची नाराजी दूर करताना तुर्तास तरी अधिकृत उमेदवार व पक्षनेतृत्वाची चांगलीच दमछाक होत असल्याची चर्चा राजकीय गोटात रंगत आहे.

Web Title: Party leader try to canvasing rebels in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.