लांबपल्ल्याच्या फेऱ्यांची संख्या घटली, प्रवाशांची गर्दी वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST2021-03-20T04:41:12+5:302021-03-20T04:41:12+5:30

वाशिम: जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे एस. टी.च्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या २६ ...

The number of long haul rounds decreased, the crowd of passengers increased! | लांबपल्ल्याच्या फेऱ्यांची संख्या घटली, प्रवाशांची गर्दी वाढली !

लांबपल्ल्याच्या फेऱ्यांची संख्या घटली, प्रवाशांची गर्दी वाढली !

वाशिम: जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे एस. टी.च्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या २६ बसफेऱ्या आगार प्रमुखांनी रद्द केल्या आहेत. त्यामुळे नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबईसह इतर महानगरांत एस. टी.ने प्रवास करणारे प्रवासी टप्प्याने प्रवास करीत असून, स्थानिक बसगाड्यांत यामुळे प्रवाशांची गर्दी होत आहे. यातून कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता अधिकच बळावली आहे.

वाशिम जिल्ह्यात गत दीड महिन्यातच ५ हजारांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. याचा व्यवसायांवर फारसा परिणाम दिसत नसला तरी, एस. टी.च्या प्रवासी वाहतुकीवर काही प्रमाणात प्रभाव पडला आहे. यामुळे एस. टी. महामंडळाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने वरिष्ठांच्या सुचनेनुसार लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक , औरंगाबाद आदी महानगरात जाणाऱ्या प्रवाशांना टप्प्याने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यांतर्गत धावणाऱ्या बसफेऱ्यांत प्रवाशांची संख्या वाढू लागली असून, यातून कोरोना संसर्गास अधिकच वाव मिळ्ण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

---------------------

महानगरांत जाणाऱ्या प्रवाशांची पंचाईत

जिल्ह्यातील चारही आगारांनी मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी जिल्ह्यात पाठविल्या जाणाऱ्या बसफेऱ्यांपैकी निम्म्या बसफेऱ्या बंद केल्या आहेत. यामुळे उपरोक्त महानगरांकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी पंचाईत झाली असून, हे प्रवासी टप्प्याने प्रवास करीत आहेत. त्यामुळे त्यांना निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागत आहे.

----------------------

मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग गुंडाळले

एकीकडे एस. टी.ची प्रवासी वाहतूक घटल्याने महामंडळाने लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रद्द केल्या आहेत, तर जिल्हांतर्गत धावणाऱ्या बसफेऱ्यांत प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजलेच आहेत, शिवाय वाहक, चालकांनीही कोरोना संसर्गापासून बचावासाठी मास्क लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

---------------------------

३२ कर्मचाऱ्यांना संसर्ग

दरदिवशी हजारो प्रवाशांना घेऊन या शहरातून त्या शहरात जाणाऱ्या चालक, वाहकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. बसस्थानकावर प्रवाशांची तपासणी करण्याची कोणतीही सुविधा नाही किंवा मास्क लावण्याबाबत तंबीही दिली जात नाही. यामुळे चालक, वाहकांचा जीव धोक्यात येत असून, जिल्ह्यातील चालक, वाहक मिळून ३२ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे.

----------

जिल्ह्यातील बसगाड्यांची संख्या - २६५

रद्द केलेल्या बसगाड्यांची संख्या - २६

जिल्ह्यातील चालक -२७८

कामगिरीवरील चालक - २५२

जिल्ह्यातील वाहक - २९१

कामगिरीवरील चालक -२७५

Web Title: The number of long haul rounds decreased, the crowd of passengers increased!