आता सरकारचा बंदोबस्त शेतकरीच करतील - रविकांत तुपकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:17 IST2017-12-10T23:06:01+5:302017-12-10T23:17:55+5:30
मिसाळ यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात संबंध महाराष्ट्रातील शेतक-यांचे दु:ख सांगितले आहे. तरीही या सरकारला जाग येत नसेल तर सरकारचा बंदोबस्त शेतकरीच करतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सरकारला दिला.

आता सरकारचा बंदोबस्त शेतकरीच करतील - रविकांत तुपकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम): सोयजना येथील ज्ञानेश्वर मिसाळ या शेतक-याने सरकारातील मंत्र्याला भेटुन, त्यांना सांगून आत्महत्या केली; मात्र मंत्र्यांनी त्यांची टिंगल टवाळी केली. त्यांना आत्महत्येपासून रोखले नाही किंवा त्यांना लढण्याचे बळ दिले नाही. त्यामुळे सरकारच्या त्या मंत्र्यांविरुध्द गुन्हे दाखल झाले पाहिजे. मिसाळ यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात संबंध महाराष्ट्रातील शेतक-यांचे दु:ख सांगितले आहे. तरीही या सरकारला जाग येत नसेल तर सरकारचा बंदोबस्त शेतकरीच करतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सरकारला दिला.
रविकांत तुपकर यांनी मानोरा तालुक्यातील सोयजना येथे रविवारी मृतक शेतकरी ज्ञानेश्वर मिसाळ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.त्यानंतर मानोरा येथील विश्राम भवनावर पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतक-यांच्या पाठीशी आहे. विदर्भात संघटनेच्यावतीने मोठे आंदोलन उभारले जाईल. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शेतक-यांना एकत्र केले जाईल व व्यवस्थेशी लढा देण्यात येईल. शेतक-यांनी मागच्या सरकारला सत्तेपासून दूर ठेवुन भाजपाचे सरकार सत्तेत आणले, मात्र मागच्या पेक्षाही हे सरकार शेतक-यांच्या बाबतीत पुढे गेले. कोणताच न्याय दिला नाही. कर्जमाफी फसवी असून, शेतकºयांच्या बायकांचे अंगठ्यांचे ठसे घेतले. मात्र उद्योगपतींनी कर्ज काढले तेव्हा त्यांच्या बायका कुठे आॅनलाईन कर्जमाफीसाठी रांगेत दिसल्या नाही. हे सरकार उद्योगधार्जीने आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. बोंडअळीमुळे कपाशी संपली. मोसेस कंपनीवर साधी कारवाई झाली नाही. म्हणून सरकारने या सर्व शेतकºयांना नुकसान भरपाई सरसकट दिली पाहिजे, देशातील कर्नाटक राज्यात सोयाबीनला जास्त भाव आहे, राज्यात मो.का नाही, महाराष्ट्र हा पाकीस्तानमध्ये आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या सरकारला छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, आत्महत्याग्रस्त मिसाळ कुटूंबातील एका मुलाला सरकारने नोकरी द्यावी, आत्महत्या करणाºया शेतक-यांना कुटूंबाला ५ लाख रुपये मदत द्यावी. सोयाबीन , कपाशी उत्पादक शेतक-यांना सरसकट अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली. आता शेतक-यांनी आत्महत्या करु नये, परिस्थिती तशी आली तर स्वाभीमानी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी राहिल. आता लढाई करुन मरा व राज्यकर्त्यांना हिसका दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले, तालुका शिवसेना प्रमुख रवि पवार, डॉ.विठ्ठलराव घाटगे, शाम पवार, आकाश गाढव, स्वप्नील धनकर, डॉ.दिपक करसडे आदि उपस्थित होते.