Maharashtra Assembly Election 2019 : निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 04:09 PM2019-10-16T16:09:50+5:302019-10-16T16:09:55+5:30

सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची येथे प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे दिसून येत आहे.

Maharashtra Assembly Election 2019: Giants' reputation on stake in elections | Maharashtra Assembly Election 2019 : निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Next

- नंदकिशोर नारे 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात आगामी २१ आॅक्टोंबरला होऊ घातलेली विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. मतविभाजनाचा फॅक्टर निकाल प्रभावित करणार असला तरी, सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची येथे प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे दिसून येत आहे.
खासदार भावना गवळी, माजी खासदार अनंतराव देशमुख, राज्याचे माजीमंत्री दिवंगत सुभाषराव झनक , राष्टÑवादी काँग्रेसचे सुभाष ठाकरे आदी दिग्गजांच्या भोवती आजवर जिल्ह्याचे राजकारण फिरत आले आहे. रिसोड मतदारसंघ हा भावना गवळी, अनंतराव देशमुख, दिवंगत सुभाषराव झनक या तिन्ही दिग्गजांची जन्मभूमी व कर्मभूमी राहिलेली आहे. त्यामुळेच या मतदारसंघाला जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखले जाते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील इतर मतदारसंघांप्रमाणेच या मतदारसंघातील राजकारणाने वेगळीच कलाटणी घेतली आहे. निवडणुकीच्या सध्याच्या चित्रानुसार ही निवडणुक अतिशय रंगतदार ठरणार आहे. या मतदार संघामध्ये एकेकाळी काँग्रेसचे जेष्ठ नेते म्हणून परिचित असलेले माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करुन अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरलेत. विद्यमान आमदार अमित सुभाषराव झनक तिसऱ्यांदा नशिब आजमावत आहेत. दुसऱ्यांदा या मतदारसंघातून दंड थोपटणाºया शिवसेनेने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ सानप यांना उमेदवारी दिली आहे. मनसेच्यावतीने उल्हामाले निवडणुक रणसंग्रामामध्ये आहेत व वंचित बहुजन आघाडीतर्फे दिलीप जाधव पहिल्यांदाच निवडणुकीत उभे आहेत. रिसोड विधानसभा निवडणुकीत दिग्गज उमेवार रिंगणात असल्यामुळे लढत ही काटयाची ठरणार आहे. निवडणुकीत रंगत दिसून येत असली तरी शिवसेना उमेदवाराला युती असताना भाजपाचे मिळत नसलेले सहकार्य, इतर पक्षातील नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी, या सर्व प्रकारामुळे उमेदवारांची चांगलीच कसरत होताना दिसून येत आहे.
वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे लखन मलिक, काँग्रेसच्या रजनी राठोड, शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार शशीकांत पेंढारकर, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. सिध्दार्थ देवळे या दिग्गज उमेदवारांसह दिलीप पांडुरंग भोजराज, भारत लक्ष्मण नांदुरे, महादा आश्रू हिवाळे, राहुल जयकुमार बलखंडे , सौरभ रविंद्र गायकवाड, संतोष बन्सी कोडीसंगत, सचिन वामनराव पट्टेबहाद्दूर उमेदवार रिंगणात आहेत. वाशिम विधानसभा मतदारासंघात असलेल्या चार दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसून येत आहे.
या उमेदवारांपुढे अनेक आव्हाने असून, ते कसे पेलतात याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. भाजपाचे लखन मलिक यांच्या ऐवजी दुसरा उमेदवार देण्यात यावा, अशी पक्षातीलच अनेकांची मागणी होती मात्र ती पूर्ण न झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. त्यामुळे हिरमोड झालेले निवडणुकीसाठी इच्छूक असलेले मलिकांसाठी कार्य करतील का, असा प्रश्न चर्चिल्या जात आहे. तसेच शिवसेनेसाठी वाशिम विधानसभा मतदारसंघ सोडण्यात यावा अशी शिवसेनेची मागणी होती, परंतु ती पूर्ण न झाल्याने शिवसैनिक नाराज होवून त्यांनी गत निवडणुकीत व्दितीय क्रमांकावर राहिलेल्या शशीकांत पेंढारकर यांना उभे केले. यामध्ये शिवसेनेतील काही पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या सोबत दिसून येत आहेत. याचा फटका भाजपालाच बसणार असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसमध्ये इच्छूक उमेदवार मोठया प्रमाणात असताना वेळेवर नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने अनेकांनी आरोप-प्रत्यारोपही केलेत.
काँग्रेसमध्ये अनेकांची उमेदवारीवरुन नाराजी झाल्याने याचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसणार असल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटातच होताना दिसून येत आहे. तसेच काँग्रेसच्यावतिने डॉ. सिध्दार्थ देवळे यांना उमेदवारी दिल्या जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. काँग्रेस पक्षश्रेष्ठीने त्यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. परंतु वेळेवर त्यांना उमेदवारी न देता दुसºयालाच उमेदवारी जाहीर केल्याने देवळे नाराज झालेत व त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा हात धरला असल्याचे बोलल्या जात आहे. देवळे हे वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेले नाव असल्याने मताचे विभाजन अटळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.


कारंजा मतदारसंघामध्ये भाजपासोबत ईतर उमेदवाराची लढत
कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे आमदार राजेंद्र पाटणी निवडणूक रिंगणात असून येथे युतीधर्म तंतोतत पाळल्या जात असल्याचे बोलल्या जात आहे. या मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीचे चित्र आहे. लढतीमध्ये सर्वच पक्षाच्या उमेदवाराची लढत आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासोबत असल्याचे चित्र आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघात पाटणीसह शिवसेनेचे बंडखोर प्रकाश डहाके हे राष्टÑवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत. तर बहुजन समाज पार्टीच्यावतिने मो. युसूफ पुंजानी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. हे तीनही दिग्गज नेते आपआपली रणनिती आखून आपला विजय कसा होईल याची रणनिती आखतांना दिसून येत आहेत. तिनही विधानसभा मतदारसंघामध्ये दिग्गजाची प्रतिष्ठा पणााला लागली असून यात कोण बाजी मारते याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Giants' reputation on stake in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.