दुष्काळी सवलती लागू; परीक्षा शुल्क परत कधी मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 15:50 IST2018-11-11T15:50:00+5:302018-11-11T15:50:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : रिसोड तालुक्यासह दोन महसूल मंडळात दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. मात्र, तत्पूर्वीच शालेय व ...

दुष्काळी सवलती लागू; परीक्षा शुल्क परत कधी मिळणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रिसोड तालुक्यासह दोन महसूल मंडळात दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. मात्र, तत्पूर्वीच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. त्यामुळे परीक्षा शुल्काचा भरणा केलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परत मिळणे अपेक्षीत आहे. याकडे संबंधित यंत्रणा लक्ष कधी देणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
यापूर्वी ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गाव, तालुका व जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू केल्या जात होत्या. यावर्षी दुष्काळ व दुष्काळसदृश परिस्थिती जाहिर करण्याच्या निकषात बदल करण्यात आलेला आहे. पावसाची सरासरी, पीक उत्पादनातील घट, जमिनीची आर्द्रता, पावसाचा खंड आदी बाब दुष्काळ जाहिर करताना विचारात घेतल्या जातात. यावर्षी अनेक तालुक्यांमध्ये तसेच महसूल मंडळात जून ते सप्टेंबर या दरम्यान पावसाने सरासरी गाठली नाही. कमी पर्जन्यमान झाल्याने उत्पादनात घट आली. रिसोड तालुक्यासह मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे तसेच मानोरा तालुक्यातील उमरी महसूल मंडळात दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे दुष्काळी सवलती लागू झाल्या. मात्र, दुष्काळ जाहिर होण्यापूर्वीच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. त्यामुळे भरलेले परीक्षा शुल्क परत मिळणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहेत. गतवर्षीदेखील दुष्काळ जाहिर झालेला होता. तेव्हाही परीक्षा शुल्काचा भरणा झाल्यानंतर दुष्काळी सवलतीची घोषणा करण्यात आली होती. गतवर्षीचे परीक्षा शुल्क अद्याप विद्यार्थ्यांना परत मिळालेले नाही. हा आकडा जवळपास १० लाखांच्या घरात जातो. आताही रिसोड तालुका तसेच जऊळका रेल्वे व उमरी महसूल मंडळातील विद्यार्थ्यांनील परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. त्यामुळे सदर शुल्क परत मिळावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.