वातावरणात बदल; बालकांना होतोय पोटदुखी, हगवणीचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 15:37 IST2019-08-24T15:37:13+5:302019-08-24T15:37:16+5:30
बालकांना पोटदुखी आणि हगवणीचा त्रास होत असल्याचे चित्र जिल्ह्यातील विविध भागांत पाहायला मिळत आहे.

वातावरणात बदल; बालकांना होतोय पोटदुखी, हगवणीचा त्रास
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: गेल्या काही दिवसांत वातावरणात बदल झाल्यामुळे विविध आजारांमध्ये वाढ झाली असून, शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी दवाखान्यांतही रुग्णांची गर्दी दिसत आहे. आता बालकांना पोटदुखी आणि हगवणीचा त्रास होत असल्याचे चित्र जिल्ह्यातील विविध भागांत पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांत वातावरणात अचानक बदल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकल्यास इतरही आजारांच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. यामध्ये बालकांचे प्रमाण सर्वाधिक असून, सर्दी, ताप, खोकला व हिवतापाचा आजार बळावत असल्याचे दिसते. शहरातील ग्रामीण रुग्णालयासह ग्रामीण भागांतील प्राथमिक आरोग्य कें द्रात अनेक रुग्ण तपासणीसाठी येत आहेत.
खासगी दवाखान्यांतही उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत असल्याचे दिसत आहे. त्यातच काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस हजेरी लावत असल्याने जलजन्य आजारही वाढत असून, बालकांना पोटदुखी आणि हगवणीचा त्रास होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तथापि, अतिसाराची साथ पसरल्याची माहिती कोठून मिळालेली नाही. आरोग्य विभागाने मात्र संभाव्य साथीचे आजार लक्षात घेऊन ठिकठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे राबविण्याची गरज निर्माण झालेली आहे. विशेषत: ग्रामीण भागांत रुग्णांचा शोध घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासह आजारांवर नियंत्रणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
(प्रतिनिधी)