भाजपा-सेना कार्यकर्ते रस्त्यावर; शहराला पाेलीस छावणीचे स्वरुप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 15:40 IST2021-08-20T15:38:27+5:302021-08-20T15:40:10+5:30
BJP-Sena workers on the streets : भाजपा कार्यालयाकडे जाणाऱ्या शिवसैनिकांना अटक

भाजपा-सेना कार्यकर्ते रस्त्यावर; शहराला पाेलीस छावणीचे स्वरुप
नंदकिशाेर नारे
वाशिम : भाजपाचे नेते किरीट साेमय्या यांनी खा. भावना गवळी यांच्या संस्थेतील भ्रष्टाचाराबाबत जे प्रकरण चाैकशीत आहे या प्रकरणाबाबत केलेले वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये माेठया प्रमाणात राेष हाेता. किरीट साेमय्या जिल्हा दाैऱ्यावर असल्याने अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता पाहता शहरात कडक पाेलीस बंदाेबस्त ठेवल्याने शहराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले हाेते. यावेळी दाेन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले दिसून आले.
भाजपाचे नेते किरीट साेमय्या भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार हाेते. तत्पूर्वी त्यांनी देगाव येथील पार्टीकल बाेर्डची पाहणी व बंद असलेल्या रस्तयाच्या कामाची पाहणी करण्याचे ठरविले. परंतु तेथे जाताच त्यांच्या वाहनावर दगडफेक व
शाई फेक झाल्याने त्यांना खाली हात परतावे लागले. त्यानंतर वाशिम येथे असलेल्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी सर्वत्र तसेच शहरातील विविध भागात कडक पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. पत्रकार परिषद सुरु हाेण्यापूर्वी काही शिवसैनिक भाजपा कार्यालयाकडे येत असतांना मधातच पाेलिसांनी त्यांना राेखले व अटक केली. आज शहरात सर्वत्र पाेलीस बंदाेबस्त चर्चेचा विषय ठरला.
दाेन्ही पक्षाच्या कार्यालयासमाेर तगडा बंदाेबस्त
जिल्हयात भाजपा नेते किरीट साेमय्या येणार असून यापूर्वी त्यांनी व्यक्त केलेल्या मताने शिवसैनिक चांगलेच आक्रमक असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने भाजपा व शिवसेना दाेन्ही पक्ष कार्यालयाठिकाणी कडक पाेलीस बंदाेबस्त ठेवला हाेता. भाजपा कार्यालय असलेल्या पाटणी कमर्शियलमध्ये प्रवेश करणारे काही प्रवेशव्दार बंद ठेवून पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता. जिल्हयात पाेलीस कडक बंदाेबस्त असतांनाही मात्र देगाव येथे अनुचित प्रकार घडून आला.