पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 18:06 IST2021-12-08T18:06:31+5:302021-12-08T18:06:37+5:30
Accused of murdering wife sentenced to life imprisonment : मुलीच होतात या कारणावरून धनंजय हा नेहमी पत्नीस मारहाण करीत होता.

पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप
वाशिम : पत्नीचा खून करणाºया भापूर (ता.रिसोड) येथील पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एम. मेनजोगे यांनी ८ डिसेंबर रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. धनंजय प्रल्हाद बोडखे (३०) असे आरोपीचे नाव आहे.
शिरपूर येथील जगन्नाथ भिवाजी काटोळे यांच्या मुलीची विवाह धनंजय बोडखे रा.भापूर याच्याशी झाला होता. मुलीच होतात या कारणावरून धनंजय हा नेहमी पत्नीस मारहाण करीत होता. याच कारणावरून त्याने २४ मे २०१८ रोजी पत्नीच्या गळ्याला दोराने आवळून जिवाने मारून टाकले आणि गळफास घेतला, असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी जगन्नाथ काटोळे यांच्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी आरोपी धनंजय बोडखे याच्याविरूद्ध भादंवी कलम ३०२, ४९८ अ नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक बाबुसिंग राठोड व पोलीस उपनिरीक्षक गणेश मुपडे यांनी प्राथमिक तपास केला तर पोलीस निरीक्षक हरिष गवळी यांनी मुख्य तपास केला. पोलीस निरीक्षक नाईकनवरे यांनी प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणाचे तपास सहाय्यक म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाईकराव यांनी काम पाहिले. साक्षी पुरावे तपासून विद्यमान न्यायाधीश एस.एम. मेनजोगे यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारच्यावतीने अॅड. व्यवहारे यांनी कामकाज पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून भिमराव गवई व ममता इंगोले यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.