70-year-old Shahir is doing voting awareness in Washim | ७० वर्षीय शाहीर करतोय पोवाड्यातून मतदान जनजागृती
७० वर्षीय शाहीर करतोय पोवाड्यातून मतदान जनजागृती


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वयाची सत्तरी ओलांडल्याने सर्वांगावर पडलेल्या सुरकुत्या, दुरचे दिसत नसल्याने डोळ्यावर लागलेला मोठ्या भिंगाचा चष्मा, अशाही अवस्थेत काळवंडलेल्या चेहऱ्यावर कुठलाच थकवा न दिसू देता ते पोवाड्यातून आजही पूर्ण दिमतीने सामाजिक विषयांवर समाज प्रबोधन करित आहेत. हल्ली विधानसभा निवडणूकीच्या काळात त्यांनी गावोगावी भेटी देऊन मतदान जनजागृतीचे कार्य हाती घेतल्याचे दिसून येत आहे.
वाशिम तालुक्यातील कार्ली या गावचे रहिवासी असलेले ७० वर्षीय अंबादास पवार यांना संपूर्ण वाशिम जिल्हा ओळखतो, तो त्यांच्यातील पोवाड्यातून समाज प्रबोधनाच्या अलौकीक गुणामुळे. उन्हाळा आला की तापमानापासून बचावासाठी नागरिकांनी कुठल्या उपाययोजना करायला हव्या, पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून स्वत:चा बचाव कसा करावा, स्वच्छता बाळगणे किती महत्वाचे आहे, हिवाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यायची, यासारख्या ज्वलंत सामाजिक विषयांवर अंबादास पवार दरवर्षी जिल्हाभर फिरून जनजागृती करतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद यासह लोकसभा, विधानसभा निवडणूकीदरम्यान नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घराबाहेर पडून मतांचा हक्क बजवावा, असे आवाहन पोवाड्यातून करण्यासोबतच निवडणूक प्रक्रियेत मतांच्या महत्वाबाबत ते प्रबोधन करतात. सद्याही त्यांनी हे कार्य अवलंबिले असून कार्ली या आपल्या गावी ते केवळ झोपण्यासाठी आणि जेवणासाठी घरी जातात. उर्वरित संपूर्ण वेळ ते समाज प्रबोधनासाठीच खर्च करित असल्याचे गावकरीही मोठ्या अभिमानाने सांगतात. ७० वर्षाच्या वयात शाहीर पवार यांनी बाळगलेली ही जीद्द हटकेच आहे.


Web Title: 70-year-old Shahir is doing voting awareness in Washim
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.