वाशिम जिल्ह्यात सौरपंपाच्या ३५६१ जोडण्या प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 16:21 IST2020-11-18T16:21:34+5:302020-11-18T16:21:44+5:30
Washim solar pumps News ३५६१ शेतकऱ्यांना सौरकृषी पंप जोडणी मिळाली नसल्याने त्यांचा रब्बी हंगाम धोक्यात आहे.

वाशिम जिल्ह्यात सौरपंपाच्या ३५६१ जोडण्या प्रलंबित
लाेकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील ९५४५ शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून सिंचन सुविधेसाठी महावितरणकडे सौरकृषी पंप जोडणीसाठी सहा महिन्यांपूर्वी अर्ज केले. त्यापैकी ६५४१ अर्जांना मंजुरी देण्यात आली, तर २९८५ अर्ज नामंजूर करण्यात आले. प्रत्यक्षात आजवर केवळ २९८० शेतकऱ्यांना जोडणी मिळाली असून, अद्यापही ३५६१ शेतकऱ्यांना सौरकृषी पंप जोडणी मिळाली नसल्याने त्यांचा रब्बी हंगाम धोक्यात आहे.
पारंपरिक उर्जास्त्रोतासाठी योजना राबविणे बंद असल्याने जिल्ह्यातील ५३२० शेतकऱ्यांच्या पारंपरिक उर्जेच्या जोडण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सौरपंपाचा आधार घेण्याचे ठरविले. तथापि, रितसर पैसे भरूनही अद्याप ३५६१ शेतकऱ्यांना सौरपंप जोडणीच मिळू शकली नाही.
जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी सहा महिन्यांपूर्वी कृषी पंपांसाठी अर्ज केले. त्यांना सौरपंप पंप जोडणी देण्याचे काम वेगात केले जात आहे. मंजूर प्रस्तावानुसार शेतकऱ्यांना क्रमवार पद्धतीने सौरपंप जोडणी दिली जाते.
-फुलसिंग राठोड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण
निवडलेल्या कंपन्यांकडून काम संथ
सौरपंप जोडणीचे उद्दिष्ट महावितरणने निवडलेल्या कंपन्यांसाठी निश्चित केले आहे. त्यात वाशिम जिल्ह्यात निवड झालेल्या कंपन्यांना सहा महिन्यांत किमान १५० सौरपंप जोडणीचे काम करावयाचे आहे. तथापि, कंपन्यांचे काम संथगतीने सुरू असल्याने अडचणीत भर पडली आहे.