VIDEO: नालासोपाऱ्यात वाहतूक पोलिसांना बाप-लेकाकडून जबर मारहाण; लायसन्सवरुन झाला वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 18:23 IST2025-07-15T17:55:15+5:302025-07-15T18:23:20+5:30
नालासोपाऱ्यात वाहतूक पोलिसांना भररस्त्यात जबर मारहाण करण्यात आली आहे.

VIDEO: नालासोपाऱ्यात वाहतूक पोलिसांना बाप-लेकाकडून जबर मारहाण; लायसन्सवरुन झाला वाद
मंगेश कराळे
नालासोपारा: शहरात कायद्याचा धाकच उरलेला नाही का, असा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी विजयनगर परिसरातील सितारा बेकरीजवळ दोन वाहतूक पोलिस हवालदारांना एका बाप-लेकाने भरदिवसा आणि भररस्त्यावर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मारहाण करणाऱ्यांची नावे मंगेश नारकर आणि त्यांचा मुलगा पार्थ नारकर अशी आहेत. या दोघांचा वाहतूक पोलिस कर्मचारी हनुमंत सांगळे आणि शेष नारायण आटरे यांच्यासोबत लायसन्स वरून काही वाद झाला. त्यानंतर या दोघांनी पोलिसांवर हल्ला केला. दोघेही वाहतूक विभागात कार्यरत असून, ड्युटीवर असताना त्यांच्यावर ही मारहाण करण्यात आली आहे.
घटनेचं कारण समोर आलं आहे की, पार्थ नारकर याच्याकडे गाडी चालवताना लायसन्स नसल्याचं आढळून आलं. पोलिसांनी लायसन्स विचारल्यावर त्याने वडिलांना घटनास्थळी बोलावलं. त्यानंतर पोलिस व बाप-लेकामध्ये वाद झाला आणि तो वाद थेट मारहाणीपर्यंत गेला. पोलिसांवर हात उचलणं ही अत्यंत गंभीर बाब असून, यावर वसई-विरारचे नवीन पोलिस आयुक्त काय कठोर पावले उचलतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांवरील वारंवार होणारे हल्ले ही चिंताजनक बाब असून, कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनाच जर संरक्षण नसेल, तर सामान्य जनतेचा काय विश्वास राहणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.