पालघरमध्ये नद्या फुगल्या, आजही मुसळधार सुरुच, धरणातील पाण्यातून विसर्ग झाल्यास धाेका वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:23 IST2025-08-19T12:23:01+5:302025-08-19T12:23:34+5:30
नद्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या गावांना मोठा धोका निर्माण होण्याची भीती

पालघरमध्ये नद्या फुगल्या, आजही मुसळधार सुरुच, धरणातील पाण्यातून विसर्ग झाल्यास धाेका वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर : गेल्या चार दिवसांपासून अर्थात शुक्रवार सकाळपासून जिल्ह्यात वसई-विरार वगळता उर्वरित ठिकाणी रिपरिप सुरू असणारा पाऊस सोमवार सकाळपासून सर्वत्र दमदार सुरू झाला. या दमदार पावसाने जिल्ह्याच्या अनेक सखल भागात पाणी साचले होते, तर काही ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक धरणांच्या साठ्यात वाढ झाली असून नद्या ही धोका पातळी जवळ पोहोचल्या आहेत.
शुक्रवार सकाळी आठ वाजल्यापासून शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३१.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून १७ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६७.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये वसई तालुक्यात सर्वाधिक १४४.५ मिलीमीटर तर पालघर तालुक्यात ११६.७ मिलीमीटर डहाणू तालुक्यात ४३.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. १८ ऑगस्ट रोजी सकाळपासून जिल्ह्यात १६.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
उद्या मंगळवारीही जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून मुसळधार पाऊस झाल्यास नद्या इशारा पातळी पार करून धोका पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अशावेळी नद्यांनी धोका पातळी ओलांडल्यास आणि त्याचवेळी धरणातील पाण्यातून विसर्ग झाल्यास या नद्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या गावांना मोठा धोका निर्माण होण्याची भीती आहे.