अट्टल घरफोड्यांकडून १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत तर ४ गुन्हे उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 02:02 IST2025-11-27T02:01:51+5:302025-11-27T02:02:46+5:30
ह्या घरफोड्यां कडून १५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून ४ गुन्हे काशिमीरा पोलिसांनी उघडकीस आणले आहेत अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

अट्टल घरफोड्यांकडून १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत तर ४ गुन्हे उघडकीस
मीरारोड- मीरारोड मधील एका घरफोडी प्रकरणी अटक केलेले दोन्ही आरोपी हे अट्टल घरफोडी असून एकावर १० तर एकावर ९ गुन्हे दाखल आहेत. ह्या घरफोड्यां कडून १५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून ४ गुन्हे काशिमीरा पोलिसांनी उघडकीस आणले आहेत अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
मीरारोडच्या पेणकरपाडा मधील रिक्षा चालक योगेश म्हात्रे यांच्या घराचे टाळे तोडून दागिने चोरी प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत होते. परिसरातील जवळपास १२५ सीसीटीव्ही फुटेज तपासल्या नंतर जगनसिंग तारासिंग कल्याणी (कलानी) ऊर्फ पाजी (वय ३९ ) रा. मरीआई नगर, कोलशेत, ठाणे ह्याला नाशिक मधून पकडले होते. त्या नंतर हनुमंत बापुराव तांबे ( वय ३१ ) रा. महासांगवी, हनुमानवाडी, ता. पाटोदा जिल्हा बीड ह्याला पाटोदा मधून पोलिसांनी अटक केली होती.
आरोपीं कडून १४ लाख ५६ हजार रूपये किंमतीचे १३ तोळे २०६ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच गुन्हयात वापरलेली ७० हजार रूपये किमतीची दुचाकी व घरफोडीसाठी वापरलेले हत्यारं असा १५ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला. घराची रेकी करून ते बंद असल्याचे हेरून घरफोडी करायचे. घरफोडी करताना ते हेल्मेट वा मास्क घालत जेणे करून त्यांची ओळख सीसीटीव्ही मध्ये कळून येऊ नये. त्यामुळे त्यांना शोधणे अवघड ठरत असे. आरोपीनी काशीमीरा भागातील २ तर दहिसर येथील सराफा दुकानात व बीडच्या अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या एकूण चार घरफोड्या उघडकीस आल्या आहेत.
ह्या आधी देखील आरोपींवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कलानी याच्यावर मुंबई, ठाणे, बीड, गुजरात भागात १० गुन्हे तर तांबे वर बीड भागात ९ गुन्हे दाखल असल्याची माहिती संदीप डोईफोडे यांनी दिली. सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे सह पोलीस पथक उपस्थित होते.