वर्दीच्या फुकटेगिरीविरोधात हॉटेलवाले एकवटले

By Admin | Updated: April 12, 2016 00:27 IST2016-04-12T00:27:27+5:302016-04-12T00:27:27+5:30

फुकटचे खाऊन-पिऊन हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराला बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी करीत वसई तालुका हॉटेल असोसिएशनने पोलीसी अत्याचाराविरोधात आता

The hotel gathered against the vacancy of the uniform | वर्दीच्या फुकटेगिरीविरोधात हॉटेलवाले एकवटले

वर्दीच्या फुकटेगिरीविरोधात हॉटेलवाले एकवटले

- शशी करपे,  वसई
फुकटचे खाऊन-पिऊन हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराला बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी करीत वसई तालुका हॉटेल असोसिएशनने पोलीसी अत्याचाराविरोधात आता आवाज उठवला आहे. पोलीसी अत्याचारामुळे हॉटेल व्यावसायिक संतप्त झाले असून हवालदाराला बडतर्फ केले नाही तर बेमुदत बंद पुकारला जाईल, असा इशारा दिला आहे.
गेल्या आठवड्यात माणिकपूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार नितीन नलावडे यांनी तृप्ती बारमध्ये दारू पिऊन बिल मागीतल्याने घिंगाणा घातला होता. तसेच हॉटेल मालकाला शिवीगाळ करीत मारहाण केली होती. याची तक्रार सीसीटीव्ही फुटेजसहीत केल्यानंतरही पोलिसांनी साधी एनसी नोंदवून नलावडेवर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे संतापलेल्या हॉटेल व्यावसायिकांनी पोलीसी अत्याचाराचा पाढा सीसीटीव्ही फुटेजसह पत्रकारांपुढे मांडला.
पोलीस हॉटेल व्यावसायिकांवर करीत असलेल्या अत्याचाराची सचित्र माहिती चक्रावून सोडणारी आहे. काही महिन्यांपूर्वी तुळींज पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल बैनवाड यांनी मोरेगाव येथील क्यू अँड क्यू बारमध्ये धिंंगाणा घातल्याचे चित्रीकरण दाखवण्यात आले. विरारमध्ये मनवेल पाडा येथील मनाली बार आणि वसईतील ग्रीन हाऊस बारमध्ये पोलिसांनी धिंंगाणा घातल्याचे चित्रीकरण हॉटेल व्यावसायिकांनी दाखवून पोलिस अत्याचाराने सीमा ओलांडल्याचा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश हेगडे यांनी केला आहे.
पोलिसांचा हा अत्याचार थांबवायचा असेल तर नलावडे सारख्या अत्याचारी पोलिसाला बडतर्फ करायलाच हवे, अशी मागणी हेगडे आणि त्यांच्या सहकार्यांनी केली आहे.

नाकाबंदी, साहेबांचा दौरा, कार्यक्रंमासाठी हजारो रुपयांचे फुकटचे जेवण, बाराही महिने फुकटे बिसलरी पाणी ही फुकटेगिरी पोलिसांकडून सुरु आहे. आता बारमध्ये फुकटची दारू पिऊन धिंंगाणा घालू लागले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक त्रस्त झाले आहेत, असे हेगडे यांनी सांगितले.
राज्य व केंद्र सरकारचे विविध पाच-सहा सेवा कर बार-परमीट रुमवाले हॉटेल व्यावसायिक •करीत आहेत, असे असताना पोलिसांचा अत्याचार सहन करावा लागत असून वर्दीच्या जाचाला कंटाळून वसईतील ७५ टक्के हॉटेलवाले व्यवसाय बदलायच्या मनस्थितीत आहेत, असेही हेगडे यांनी सांगितले.

Web Title: The hotel gathered against the vacancy of the uniform