मीरा भाईंदरमध्ये पूरस्थिती; महापालिका प्रशासनावर लोकांचा संताप 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 09:42 PM2023-06-28T21:42:26+5:302023-06-28T21:42:47+5:30

मीरा भाईंदर मध्ये पहिल्याच पावसात शनिवारी ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. बुधवारी देखील शहरातली परिस्थिती बिकट झाली होती.

Flood situation in Mira Bhayander People's anger on municipal administration | मीरा भाईंदरमध्ये पूरस्थिती; महापालिका प्रशासनावर लोकांचा संताप 

मीरा भाईंदरमध्ये पूरस्थिती; महापालिका प्रशासनावर लोकांचा संताप 

googlenewsNext

मीरारोड - यंदाची नाले सफाई अत्यंत चांगली झाल्याचे सांगत, पाणी भरण्याचे खापर विकासक आदींवर फोडणाऱ्या प्रशासनावर संताप व्यक्त होत असून मीरा भाईंदर शहरात आजही पूरस्थिती निर्माण झाल्याने वाहतूक विस्कळीत होऊन लोकांचे हाल झाले. 

मीरा भाईंदर मध्ये पहिल्याच पावसात शनिवारी ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. बुधवारी देखील शहरातली परिस्थिती बिकट झाली होती. मीरारोडच्या कृष्ण स्थळ मध्ये तर कमरे पेक्षा जास्त पाणी साचले होते. मीरारोड मधील शांती नगर, नया नगर, शीतल नगर, विजय पार्क, सिल्वर पार्क, कनकिया, मीरा गाव - हनुमान मंदिर, दहिसर चेकनाका, हटकेश, सुंदर सरोवर, मनउपास ट्रान्झिस्ट कॅम्प, घोडबंदर, काशीमीरा आदी जवळ पस बहुतांश परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. 

भाईंदरच्या बेकरी गल्ली. देवचंद नगर, मुर्धा, राई - मोरवा रस्ता, उत्तन, भाईंदर पूर्व औद्योगिक वसाहत, काशी नगर परिसर, बाळाराम पाटील मार्ग, महात्मा ज्योतिबा फुले ( केबिन रोड )  मार्ग, गोल्डन नेस्ट, तलाव मार्ग आदी जवळपास सर्वच परिसर जलमय झाला होता. 

लोकांच्या घरात पाणी शिरल्याने हाल झाले व अनेक वस्तूंचे नुकसान झाले. औद्योगिक वसाहती व दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले. वाहतूक विस्कळीत झाली होती. 

नालेसफाई अत्यंत चांगली झाली सांगत  विकासकांनी भराव करून इमारती बांधल्या मुळे तसेच अनेक वर्षांचे निर्माण झालेले प्रश्न  मुळे शहरात पाणी साचते असे उपायुक्त रवी पवार यांनी म्हटले होते. त्यावरून नागरिकांसह राजकारणी आदींनी, ह्या तर चोरांच्या उलट्या बोंबा असल्याची टीका चालवली आहे. 

शहरातील नैसर्गिक ओढे, खाड्या व नाले क्षेत्रातील बेकायदा भराव व बांधकामे यांना दिले जात असलेले अर्थपूर्ण संरक्षण, पोकळ व दिखावा ठरलेली नालेसफाई, कांदळवन - पाणथळ, सीआरझेड १ व नैसर्गिक क्षेत्रात होणारे बेकायदा भराव - बांधकामे ,  अंतर्गत गटार, नाले व खाड्यात टाकला जाणारा कचरा आदी गंभीर बाबीं कडे अनेक महापालिका अधिकारी, तत्कालीन नगरसेवक व राजकारणी यांचा कानाडोळा शहरात पुरस्थितीला कारणीभूत असल्याचे आरोप जागरूक नागरिकांनी केले आहेत. ह्या अधिकाऱ्यांवर निलंबनासह गुन्हे दाखल करण्याची कारवाईची मागणी लोकांनी केली आहे. 

दरम्यान दुपारपर्यंत १५० मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी मोठी भरती आणि त्याच वेळेत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शहरातील सखल भागामध्ये पाणी साचले असल्याचा कांगावा पालिका अधिकाऱ्यांनी चालवला आहे.  

तर पाणी साचणाऱ्या भागात ६५ ठिकाणी मोटार पंप लावून पाणी उपसा केला आहे.  पाणी तुंबते त्या भागात गटार, नाले आदींना ड्रिल ने मोठी भोके पाडून पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शहरातील पाणी साचलेल्या भागांची पाहणी करून आढावा घेतला व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असे पालिका उपायुक्त रवी पवार यांनी सांगितले.

Web Title: Flood situation in Mira Bhayander People's anger on municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.