सारख्या रंगाने गोंधळ; दुसऱ्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवले २६ तोळे सोन्याचे दागिने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 11:50 IST2026-01-06T11:50:12+5:302026-01-06T11:50:30+5:30
पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न करत त्या महिलेच्या २६ तोळे दागिन्यांचा शोध लावून ते महिलेच्या ताब्यात दिले आहेत.

सारख्या रंगाने गोंधळ; दुसऱ्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवले २६ तोळे सोन्याचे दागिने
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : सारखाच रंग असल्याने आपली दुचाकी समजून एका महिलेने शेजारी पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीत २६ तोळे सोन्याचे दागिने ठेवल्याची घटना वसईत घडली. हे दागिने गहाळ झाल्याच्या भीतीने तिने वसई पोलिस ठाणे गाठले. अखेर वसईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न करत त्या महिलेच्या २६ तोळे दागिन्यांचा शोध लावून ते महिलेच्या ताब्यात दिले आहेत.
वसईच्या गिरीज गावातील लिनेट ऍशली अल्मेडा (४२) २ जानेवारीला संध्याकाळी होळी शाखा येथील बॅसिन कॅथलिक बँकेत गेल्या होत्या. त्यांनी बँकेच्या लॉकरमधून बांगड्या, चेन, हार, सोन्याची बिस्किटे, कर्णफुले असे २६ तोळे वजनाचे व ३५ लाख रुपये किमतीचे दागिने काढले. ते त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवले.
घरी पोहोचल्यावर डिक्की तपासली असता दागिने आढळले नाही. वसई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी दागिन्यांचा शोधासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाला आदेश दिले. दरम्यान, बाजूच्या दुचाकीची डिक्की उघडीच असावी आणि घाईघाईत महिलेने डिक्कीत सोने ठेवले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली.
दोन पथके, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
बॅसिन कॅथलिक बँकेच्या होळी शाखा येथे जाऊन तेथील तसेच परिसरातील सीसीटीव्ही तपासले. मात्र, माहिती मिळत नव्हती. अखेर वसई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी, अंमलदार यांच्या दोन टीम तयार करून घटनास्थळ तसेच शेजारील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व बातमीदाराच्या मदतीने तांत्रिकदृष्ट्या तपास करून दागिने ठेवलेल्या दुचाकीची माहिती मिळवली.
त्यानंतर पोलिसांनी तत्काळ दुचाकी चालक महिला सुनीता फ्रेडी गोन्साल्विस यांच्याकडे जाऊन चौकशी करून गहाळ झालेले दागिने पीडित महिलेस परत मिळवून दिले आहे. वसई पोलिसांचे लेनिट यांनी मानले आहे. ही कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि महेंद्र भामरे, पोहवा प्रशांत पाटील, सूर्यकांत मुंडे, दिनेश पाटील, प्रशांत आहेर, सौरभ दराडे, अक्षय नांदगावकर, अमोल बरडे यांनी पार पाडली आहे.