आजारपण, दुखणी अन्... ८१ वर्षीय वृद्धाने पत्नीचा चिरला गळा; स्वतःलाही संपण्याचा प्रयत्न केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:35 IST2025-09-08T18:35:31+5:302025-09-08T18:35:56+5:30
वसईमध्ये पत्नीची हत्या करुन पतीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

आजारपण, दुखणी अन्... ८१ वर्षीय वृद्धाने पत्नीचा चिरला गळा; स्वतःलाही संपण्याचा प्रयत्न केला
Vasai Crime: वसईत वृद्ध पत्नीची हत्या करुन पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. वसईच्या ८१ वर्षीय वृद्धाने त्याच्या ७४ वर्षीय पत्नीचा चाकूने गळा चिरून खून केला आणि नंतर स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वृद्ध व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं. आरोपी पतीवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दोघेही बऱ्याच काळापासून आजारी होते. दोघांनाही मान, पाठ, गुडघा आणि इतर आजारांनी ग्रासले होते. शनिवारी रात्री ८:३० च्या सुमारास गॅब्रिएल परेरा यांनी त्यांची पत्नी अर्टिना परेरा यांची स्वयंपाकघरातील चाकूने हत्या केली. त्यानंतर त्यांनी त्याच चाकूने स्वतःचे मनगट कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत परेरा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हा सगळा प्रकार घडला तेव्हा परेरा यांचा मुलगा घराबाहेर होता. घर आतून बंद असल्याने, परत आल्यावर त्याने दरवाजा तोडला. तेव्हा त्याला त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात मृत आढळली आणि त्याचे वडील गंभीर जखमी झाल्याचे दिसले. त्याने ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली.
वसई पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. तर गॅब्रिएल परेराविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.