गुरूच्या नावाला काळिमा ! शिक्षकाने चार विद्यार्थिनींशी केले गैरवर्तन; तक्रार पेटीतून उघड झाला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:36 IST2026-03-21T13:34:59+5:302026-03-21T13:36:12+5:30
Wardha : अल्लीपूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले. ही घटना गुरुवारी उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

The name of the teacher is tarnished! The teacher misbehaved with four students; The incident was revealed in the complaint box
लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपुर (वर्धा): अल्लीपूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले. ही घटना गुरुवारी उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
शिक्षकाचे पवित्र कार्य करणाऱ्या एका शिक्षकाने शाळेतील विद्यार्थिनींशी घृणास्पद वर्तन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एक नव्हे तर चार विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील आरोपी शिक्षकाविरुद्ध अल्लीपूर पोलिसांनी विविध कलमांसह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी रात्री आरोपी दीपक मंडलिक (४०) नामक शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. अल्लीपूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावातील जिल्हा परिषद शाळेत पीडित विद्यार्थिनी चौथीत शिकत आहे.
दीपक नावाचा शिक्षक त्याच शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत होता. पीडित विद्यार्थिनीसह तिच्या आणखी चार मैत्रिणीही त्याच शाळेत शिक्षण घेत आहेत. शिक्षणाच्या बहाण्याने आरोपी शिक्षक या विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील वर्तन करत होता.
गेल्या महिन्यापासून प्रकार, मुख्याध्यापकांनी घेतली दखल
हा प्रकार फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होता. अखेर त्रस्त विद्यार्थिनींनी शाळेच्या तक्रार पेटीत तक्रार टाकली. या तक्रारीत शिक्षकाने केलेल्या 'बॅड टच'चा उल्लेख करण्यात आला होता. ही तक्रार मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ बैठक बोलावून प्रकरणाची गंभीर दखल घेतली. शिवाय चौकशी सुरू केली. संबंधित विद्यार्थिनींची चौकशी करून जिल्हा परिषद शिक्षण विभागालाही माहिती देण्यात आली. यानंतर मुख्याध्यापकांनी पीडित विद्यार्थिनींच्या तक्रारीच्या आधारे आरोपी शिक्षक दीपक मंडलिक याच्याविरुद्ध अल्लीपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली. घटनास्थळी पुलगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखेले यांनी भेट दिली. अल्लीपूर पोलिसांनी आरोपीला गुरुवारी रात्री अटक केली.