पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 21:13 IST2025-08-28T21:13:40+5:302025-08-28T21:13:54+5:30
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला मिळाले मूर्त रूप

पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
वर्धा : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे ठिकाण राहिलेल्या सेवाग्राम-पवनार येथून नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाची सुरुवात करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली होती. अखेर गुरुवारी आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या पवनार येथून या महामार्गाला प्रारंभ होणार असल्याचा शासन निर्णय काढण्यात आला. त्यामुळे वर्धा जिल्हावासीयांसाठी ही मोठी उपलब्धी ठरली आहे.
नागपूर ते गोवा हा महाराष्ट्रशक्तिपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधदुर्ग या १२ जिल्ह्यांतून जाणार असून, या जिल्ह्यांतील एकूण ३९ तालुक्यांतील ३७० गावे या महामार्गाशी जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठे तुळजापूर, कोल्हापूर, माहूर यांसह १८ धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे नागपूर ते गोव्यापर्यंतचा सद्यःस्थितीतील १८ तासांचा प्रवास साधारणतः आठ तासांवर येणे अपेक्षित आहे. म्हणूनच वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंतचा महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प हाती घेण्यास मान्यता, आखणीस व भूसंपादनाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा शासन आदेश काढण्यात आला. या आदेशामुळे या शक्तिपीठाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
पवनार ते सांगलीपर्यंतच्या आखणीस मान्यता
पवनार ते पत्रादेवी या शक्तिपीठ महामार्गाची अंदाजित लांबी ८०२.५९२ कि.मी. असून हा प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास मान्यता देण्यात आली. तसेच पवनार ते सांगलीपर्यंतच्या आखणीस मान्यता देण्यात आली. मूळ मंजूर आखणीपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यांतील आखणीच्या महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ च्या कलम ३ व कलम १५ (२) ची अधिसूचना दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेन्वये रद्द करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे.
महामार्गाकरिता २० हजार ७८७ कोटींचा खर्च
महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाकरिता भूसंपादनाची कार्यवाही करण्यासही शासनाने मान्यता दिली. सोबतच या प्रकल्पाकरिता १२ हजार कोटी मूळ रक्कम आणि ८ हजार ७८७ कोटींचे संभावित व्याज, अशा एकूण २० हजार ७८७ कोटींच्या रकमेसही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
वर्धा जिल्हा हा समृद्धी महामार्गाशी जोडल्यानंतर आता शक्तिपीठ महामार्गही जिल्ह्यातून जात असल्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाची सुरुवात जिल्ह्याच्या पवनार येथून करण्यास मान्यता दिली. ही वर्धा जिल्ह्याकरिता मोठी उपलब्धी असून, त्यांनी यापूर्वीच याची घोषणा केली होती, ती आज पूर्णत्वास गेली. -डॉ. पंकज भोयर, पालकमंत्री, वर्धा.