राधिका रेस्टॉरेंटचा परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 06:00 AM2019-12-11T06:00:00+5:302019-12-11T06:00:05+5:30

राधिका रेस्टॉरेंटमधील आईस्क्रीममध्ये मृत कीटक आढळल्याच्या तक्रारीवरून अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी २२ नोव्हेंबर रोजी हॉटेलची तपासणी केली होती. तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ व नियमन २०११ च्या अनेक तरतुदींचे सर्रास उल्लंघन, शिवाय हॉटेलमध्ये सर्वत्र अस्वच्छता असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले.

Radhika restaurant license suspended | राधिका रेस्टॉरेंटचा परवाना निलंबित

राधिका रेस्टॉरेंटचा परवाना निलंबित

Next
ठळक मुद्देकिचनसह सर्वत्र आढळली अस्वच्छता : पाच दिवस हॉटेल बंद ठेवण्याचे ‘एफडीए’चे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळून आल्याने अन्नसुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत शहरातील प्रमुख मार्गावरील राधिका रेस्टॉरेंटचा परवाना पाच दिवसांकरिता निलंबित करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली.
राधिका रेस्टॉरेंटमधील आईस्क्रीममध्ये मृत कीटक आढळल्याच्या तक्रारीवरून अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी २२ नोव्हेंबर रोजी हॉटेलची तपासणी केली होती. तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ व नियमन २०११ च्या अनेक तरतुदींचे सर्रास उल्लंघन, शिवाय हॉटेलमध्ये सर्वत्र अस्वच्छता असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी रेस्टॉरेंटच्या संचालिका सुनीता सुनील मुरारका यांना सुधारणा नोटीस बजावली होती. सुधारणा करण्याकरिता पुरेसा कालावधीदेखील दिला होता. फेरतपासणीदरम्यान रेस्टॉरेंटमालकाने स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले.
आढळलेले दोष, कायद्याचे उल्लंघन याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी धाबर्डे यांनी पुढील आदेशाकरिता प्रकरण सहाय्यक आयुक्त (अन्न) तसेच परवाना अधिकारी जयंत वाणे यांच्याकडे सादर केले होते. अस्वच्छतेच्या कारणावरून हॉटेलचा परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे राधिका रेस्टॉरेंटचा परवाना १३ ते १७ डिसेंबर या पाच दिवसांच्या कालावधीकरिता निलंबित करण्यात आला आहे. निलंबन कालावधीत रेस्टॉरेंटद्वारे अन्नपदार्थांचे उत्पादन, वितरण, खरेदी आणि विक्री करण्यात येऊ नये, असे लेखी आदेशही रेस्टॉरेंट मालक सुनीता मुरारका यांना देण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक हॉटेलमध्ये अस्वच्छता असते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशीच हॉटेलमालकांचा खेळ सुरू आहे. येत्या काळात या हॉटेल्सची तपासणी, कारवाई होणार आहे.

नाताळ आणि नववर्षानिमित्त जिल्ह्यातील सर्वच हॉटेल्सची धडक मोहिमेंतर्गत तपासणी केली जाणार असून अन्नसुरक्षा व मानदे कायदा व नियमन २०११ च्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या तसेच स्वच्छतेचे निकष न पाळणाऱ्या हॉटेल, पेढ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
- जयंत वाणे, परवाना अधिकारी तथा सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, वर्धा.

Web Title: Radhika restaurant license suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :hotelहॉटेल