पोलीस आले अन् भाजप पदाधिकारी पळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:00 AM2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:00:39+5:30

शहरातील धंतोलीस्थित भाजपा जिल्हा कार्यालयातील या सोहळ्याला ५० पेक्षा अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमले होते. याची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ जिल्हा कार्यालयात दाखल झाले. पोलिस आल्याची माहिती सत्कारमूर्तीसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मिळताच, कारवाईच्या धाकाने साऱ्यांनी जिल्हा कार्यालयातून मिळेल त्या मार्गाने पळ काढल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

Police came and BJP office bearers fled | पोलीस आले अन् भाजप पदाधिकारी पळाले

पोलीस आले अन् भाजप पदाधिकारी पळाले

Next
ठळक मुद्देजिल्हा कार्यालयातील प्रकार : संचारबंदीच्या काळातच सत्कार सोहळ्याचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याचा आरोप करुन राज्य शासनावर टिकेची झोड उठविण्याची एकही संधी न सोडणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कार्यालयात नवनियुक्त प्रदेश सचिवांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. कोणतीही परवानगी न घेता आयोजित या कार्यक्रमाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी भाजपचे जिल्हा कार्यालय गाठतच सत्कार सोहळ्याला आलेल्या पाहुण्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कारवाईच्या धाकाने धूम ठोकली. यावरुन जिल्ह्यातील कोरोनाचा संक्रमणाबाबत भाजपाच किती गंभीर आहेत, हे या प्रकारावरुन दिसून आले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देवळी विधानसभा क्षेत्रात भाजपासोबतच बंडखोरी करणारे भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी पक्षातील कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र, पक्षातील त्यांच्या ‘संघटन’ हितामुळे त्यांना केवळ जिल्हाअध्यक्ष पदावरुन पायउतार केले. नुकताच झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या नियुक्त्यांमध्ये त्यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. राजेश बकाने यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याने वर्धा शहरातील भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी कोरोना संक्रमणाची भीती आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावत रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास सत्कार सोहळ्याचे आयोजन केले.
शहरातील धंतोलीस्थित भाजपा जिल्हा कार्यालयातील या सोहळ्याला ५० पेक्षा अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमले होते. याची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ जिल्हा कार्यालयात दाखल झाले. पोलिस आल्याची माहिती सत्कारमूर्तीसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मिळताच, कारवाईच्या धाकाने साऱ्यांनी जिल्हा कार्यालयातून मिळेल त्या मार्गाने पळ काढल्याची चर्चा शहरात रंगली आहे. शहरात एकीकडे कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असल्याने त्याला रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र झटत आहे. पण, अशाही गंभीर परिस्थितीमध्ये कधीकाळी पक्षाची दगाफटका करणाऱ्या नवनियुक्त प्रदेश सचिवांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करणारा निष्ठावान कार्यकर्ता कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

१३ पदाधिकाऱ्यांसह इतर ३५ जणांविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल
भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र आल्याची माहिती तहसीलदारांनी रामनगर पोलिसांना दिल्यानंतर रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तेव्हा कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ते दिसून आल्याने संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे भाजपाचे शहर अध्यक्ष पवन परियाल, प्रशांत इंगळे, गुंडू कावळे, सुनिता ढवळे, मंजुषा दुधबडे, प्रशांत बुरले, निलेश किटे, विरु पांडे, प्रदिपसिंग ठाकूर, श्रीधर देशमुख, शीतल डोंगरे, गिरीश कांबळे, अशोक कलोडे या पदाधिकाऱ्यांसह ३५ ते ४० व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

आजच्या सत्कार समारंभाबाबत मला कुठलीच माहिती नव्हती. दुपारनंतर मला काहींनी फोन करुन जिल्हा कार्यालयात पोलीस आले होते, असे सांगितले. तेव्हा कुठे सत्कार सोहळा संपन्न झाल्याचे कळले. माझ्या माहितीप्रमाणे त्या कार्यक्रमात ज्येष्ठ पदाधिकारी कोणीही उपस्थित नव्हते. कोरोनाच्या काळात असे कार्यक्रम घेणे अयोग्यच आहे.
- डॉ. शिरिष गोडे, जिल्हाध्यक्ष, भाजप, वर्धा.

Web Title: Police came and BJP office bearers fled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.