धक्कादायक... अघोरी विद्या प्राप्तीसाठीच दाबला ‘रितिक’चा गळा, घटनेनं वर्ध्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 07:42 IST2022-05-22T07:41:11+5:302022-05-22T07:42:00+5:30

‘जिन’ला वश करण्यासाठी बळी घेतल्याची आरोपींची कबुली

Hrithik's throat was squeezed just to get Aghori Vidya in wardha | धक्कादायक... अघोरी विद्या प्राप्तीसाठीच दाबला ‘रितिक’चा गळा, घटनेनं वर्ध्यात खळबळ

धक्कादायक... अघोरी विद्या प्राप्तीसाठीच दाबला ‘रितिक’चा गळा, घटनेनं वर्ध्यात खळबळ

आर्वी/वर्धा : तुमच्या मुलाच्या अंगात ‘जिन’ घुसला आहे. मी पूजा करतो, रितिकला तुम्ही झोपू द्या, असे म्हणत अमरावती येथील तरुणाची आर्वीच्या तथाकथित मांत्रिकाने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने थेट गळा दाबून हत्या केली. जिनला वश करून अधिकची अघोरी विद्या आत्मसात करण्यासाठीच हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. 

बेलपुरा अमरावती येथील रितिक सोनकुसरे (२२) याची वारंवार प्रकृती बिघडत असल्याने रितिकचे वडील गणेश यांनी एका महिलेच्या सांगण्यावरून त्यांच्या मुलाला उपचारासाठी आर्वी येथील तथाकथित मांत्रिकाकडे १६ मे रोजी रात्री आणले होते. रितिकला बघितल्यावर तथाकथित मांत्रिक अब्दुल रहिम अब्दुल मजीद याने गणेश यांना तुमच्या घरात जिन आहे आणि तो रितिकवर हावी असल्याचे पटवून सांगितले. त्यानंतर त्याने दोन साथीदारांना सोबत घेत सोनकुसरे यांचे अमरावती येथील सोनकुसरे यांच्या घराची पाहणी केली. १७ मे रोजी आर्वी येथे परतल्यावर रितिकच्या अंगातील जिन आपण बाहेर काढून देतो, असे म्हणत अब्दुल रहिम अब्दुल मजीद याने रात्री उशिरा पूजा मांडली. याच पूजेदरम्यान जिनला वश करून अघोरी विद्येत भर टाकण्याची इच्छा बाळगणाऱ्या अब्दुल रहिम अब्दुल मजीद याने अब्दुल जुनेद अब्दुल रहिम व अब्दुल जमीर अब्दुल रहिम याच्या मदतीने रितिकचा गळा आवळून त्याची हत्या केली.

घरीच भरवला जायचा सैलानी दरबार

मागील सुमारे १८ वर्षांपासून अब्दुल रहिम अब्दुल मजीद हा मांत्रिक असल्याचे सांगत घरातच अंधश्रद्धेचा दरबारच मांडत होता. त्यालाच त्याने व्यावसायिक रूपही दिले होते. निंबू, बिबे, काळे धागे मंतरून तो कुठल्याही आजाराचा उपचार करतोच असा देखावा करायचा. कागदात बांधून पुड्या देणे, अंडी मंतरून चौरस्त्यावर फेकावयास देणे, निंबू मंतरून त्याचे दोन तुकडे करून करणी केली असल्याचे सांगून तो अनेकांकडून पैसेही उकळायचा, असे आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे.

आरोपींत बापलेकांचा समावेश

आरोपी अब्दुल रहिम हे उर्वरित दोन आराेपींचे वडील असून, या तिन्ही आरोपींना आर्वी पोलिसांनी कारंजा येथील न्यायालयात हजर करून त्यांची २७ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे.
 

Web Title: Hrithik's throat was squeezed just to get Aghori Vidya in wardha