एक रुपयात पीक विमा कवच; तरी केवळ १२.३४ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी!

By महेश सायखेडे | Published: July 16, 2023 09:47 PM2023-07-16T21:47:14+5:302023-07-16T21:47:25+5:30

१६ दिवसांतील स्थिती : कर्जदार अन् बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना ऐच्छिक

Crop insurance cover at one rupee still only 12.34 percent of farmers registered | एक रुपयात पीक विमा कवच; तरी केवळ १२.३४ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी!

एक रुपयात पीक विमा कवच; तरी केवळ १२.३४ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी!

googlenewsNext

महेश सायखेडे, वर्धा: जिल्ह्यात एकूण २.४९ लाख शेतकरी खातेदार आहेत. रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ३० हजार ७१७ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली आहे. यंदा पीक विमा योजनेत काही बदल करण्यात आले असले, तरी मागील १६ दिवसांत जिल्ह्यातील केवळ १२.३४ टक्केच शेतकऱ्यांनी पीक विम्याचे कवच घेतल्याचे वास्तव आहे.

पावसाचा खंड, अतिवृष्टी, पूर, अवकाळी पाऊस आदी आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे नेहमीच मोठे नुकसान होते. अशाच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, या हेतूने केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. पूर्वी ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी क्रमप्राप्त करण्यात आली होती. पण विरोध झाल्याने कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी संबंधित योजना ऐच्छिक करण्यात आली आहे. ३१ जुलै ही पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या नोंदणीची अंतिम मुदत असून, आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ १२.३४ टक्केच शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केल्याचे सांगण्यात आले.

३.५९ लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड

यंदा खरीप हंगामात किमान ४ लाख ११ हजार ९३६ हेक्टर जमिनीवर विविध पिकांची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ९५ हेक्टरवर तूर, सोयाबीन, कपाशी आदी पिकांची लागवड झाली आहे. त्याबाबतची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.

एक रुपयात घेता येते विमा कवच

प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांना एक रुपयात पिकांना विमा कवच घेता येते. तसे बदल यंदाच्या वर्षी राज्य शासनाने केले आहेत.

७२ तासांत द्यावी लागते माहिती

एक रुपयात विमा उतरविल्यानंतर नुकसान झाल्यास झालेल्या नुकसानाची माहिती संबंधित शेतकऱ्याने ७२ तासांच्या आत विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक किंवा संबंधित बँक, कृषी व महसूल विभागाला देणे क्रमप्राप्त आहे. वर्धा जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीला पीक विम्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे.

२४ तासांत ५,०९८ शेतकऱ्यांची नोंदणी

रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ३० हजार ७१७ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली आहे. तर मागील २४ तासांत ५,०९८ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी नाेंदणी केल्याचे सांगण्यात आले.
ग्राफ २४ तासांतील कामात हिंगणघाट तालुका राहिला पुढे

  • आर्वी : ४७४
  • आष्टी : ३५३
  • देवळी : ७४३
  • हिंगणघाट : ९७५
  • कारंजा : ७७१
  • समुद्रपूर : ५५९
  • सेलू : ४५३
  • वर्धा : ७७०
  • पाॅईंट
  • तालुकानिहाय पीक विम्याच्या नोंदणीची स्थिती
  • तालुका : खातेदार शेतकरी : नोंदणी केलेले शेतकरी
  • आर्वी : २९,९९० : ३,४२२
  • आष्टी : १८,४५७ : १,९३६
  • देवळी : ३३,४४२ : ५,८८८
  • हिंगणघाट : ४०,०८९ : ४,६५६
  • कारंजा : २६,९९७ : ४,६६८
  • समुद्रपूर : ३८,१७० : ३,२३०
  • सेलू : २८,०८३ : २,९५९
  • वर्धा : ३३,९३४ : ४,०१२


प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. एक रुपयात शेतकऱ्यांना यंदा पीक विम्याचे कवच घेता येणार आहे. जिल्ह्यात २ लाख ४९ हजार १६२ शेतकरी खातेधारक आहेत. त्यापैकी ३० हजार ७७१ शेतकऱ्यांनी रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पीक विम्यासाठी नाेंदणी केली आहे. -प्रभाकर शिवणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

Web Title: Crop insurance cover at one rupee still only 12.34 percent of farmers registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी