कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी कोविड चाचणी आवश्यकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:00:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क देऊरवाडा/आर्वी : उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशाला आर्वीत विरोध होत असतानाच मंगळवारी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आर्वी ...

Covid test is necessary to brake the corona | कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी कोविड चाचणी आवश्यकच

कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी कोविड चाचणी आवश्यकच

ठळक मुद्देविवेक भिमनवार : आर्वीतील व्यापारी, खासगी डॉक्टरांशी चर्चेनंतरही तोडगा नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशाला आर्वीत विरोध होत असतानाच मंगळवारी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आर्वी गाठून न.प.च्या सभागृहात व्यापारी तसेच खासगी डॉक्टरांशी चर्चा केली. व्यापारी आणि डॉक्टरांचे म्हणणे समजावून घेतल्यावर ‘कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी कोविड चाचणी आवश्यक आहे, रॅपिड अ‍ॅन्टिजेन किटद्वारे करण्यात येणाऱ्या कोविड चाचणी मोहिमेला आर्वीकरांनी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले.
आर्वीचे उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक यांनी २६ जुलैला काढलेल्या आदेशाला आर्वीत विरोध दर्शविला जात आहे. सोमवारी काही खासगी डॉक्टरांनी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यानंतर आज नगरपालिकेच्या सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांचे प्रतिनिधी डॉ. रिपल राणे, डॉ. श्यामसुंदर भुतडा, डॉ. रोशन जवळेकर तसेच व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी हाजी सुलेमान, अनिल लालवाणी, विजय अग्रवाल, अ‍ॅड. दीपक मोटवानी, गौरव जाजु यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. पण शाब्दिक चकमक होणार याचा अंदाज येताच कोविड चाचणी करावीच लागेल असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी न.प. सभागृहातून काढता पाय घेतला. चर्चेत कुठलाही तोडगा न निघाल्याचा आरोप आदेशाला विरोध दर्शविणाऱ्यांकडून केला जात आहे. या बैठकीला आ. दादाराव केचे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता झोपाटे (हरणे), वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे, न.प. मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, डॉ. रोशन जवळेकर, डॉ. दिवाकर ठोंबरे, डॉ. अभिलाश धरमठोक, डॉ. सचिन हिवसे, डॉ. उमेश गुल्हाणे आदींची उपस्थिती होती.

व्यापाऱ्यांत फूट पाडण्याचा प्रयत्न - हाजी सुलेमान
कोरोना टेस्ट करा आणि दुकाने उघडा असे आज जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. मग आता संचारबंदी ३० जुलैपर्यंत लागू आहे. मग दुकाने उघडणार कशी? व्यापाऱ्यांमध्ये हा फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही व्यापाऱ्याने याला बळी पडू नये, असे व्यापारी संघटनेचे हाजी सुलेमान यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Covid test is necessary to brake the corona