बोंदरठाणा पाझर तलाव शासन दप्तरी गायब

By Admin | Updated: April 22, 2016 03:53 IST2016-04-22T03:53:16+5:302016-04-22T03:53:16+5:30

तालुक्यात सन १९७२ मध्ये ‘पायरप’ योजनेंतर्गत बोंदरठाणा शिवारात पाझर तलाव बांधण्यात आला. ४४ वर्षे झालीत; पण

Bondarthana Pazhar Lake Government Dumpery disappeared | बोंदरठाणा पाझर तलाव शासन दप्तरी गायब

बोंदरठाणा पाझर तलाव शासन दप्तरी गायब

अरूण फाळके ल्ल कारंजा (घाडगे)
तालुक्यात सन १९७२ मध्ये ‘पायरप’ योजनेंतर्गत बोंदरठाणा शिवारात पाझर तलाव बांधण्यात आला. ४४ वर्षे झालीत; पण अद्यापही या तलावाचे काम पूर्ण झाले नाही. हा तालाव दुसऱ्या योजनेतून पूर्ण करण्याची मागणी करण्याकरिता परिसरातील शेतकरी संबंधीत विभागाकडे गेले असता असा कुठलाही तलाव येथे तयार झाल्याची नोंदच शासन दप्तरी नसल्याची आश्चर्यचकीत करणारा प्रकार उघड झाला.
ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या तलावात गेल्या त्यांच्या सातबारावर मात्र येथे तलाव असल्याची नोंद करण्यात आली आहे. शिवाय ज्या भागात हा तलाव होणार होता, त्या भागात मातीच्या मोठ्या भिंती उभारण्यात आल्याच्या खुना दिसत आहेत. या तलावाकरिता मोठी रक्कम खर्च झाली असून त्याची उचल संबंधीत कंत्राटदाराने केल्याची माहिती गावातील काही ज्येष्ठ नागरिक देत आहेत. यात परिसरातील १० शेतकऱ्यांची ५० एकर जमीन अधिग्रहीत करण्यात आली; मात्र त्यांना या तलवाचा कुठलाही लाभ झाला नाही.
चिंचोली, बोंदरठाणा, सावली, राजनी, सोनेगाव या पाच गावातील विहिरीची पाण्याची पातळी वाढून, सिंचनाची सोय व्हावी, जनावरांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी, म्हणून १९७२ मध्ये राज्य शासनाच्या ‘पायरप’ योजनेंतर्गत बोंदरठाणा शिवारात खडक नदीचे पाणी अडवून पाझर तलाव बांधण्याचा निर्णय झाला. लाखो रुपये खर्चून १० शेतकऱ्यांची ५० एकर जमीन अधिग्रहीत करून पाझर तलावाचे काम सुरू झाले. संबंधीत शेतकऱ्यांना शेतीचा मोबदला सुध्दा देण्यात आला. तत्कालीन बांधकाम ठेकेदाराने धरणाच्या मातीच्या दोन भिंती, पायवा न करता बांधल्यात; पण, तलावाची ओव्हरफ्लोची सिमेंटची मुख्य भिंत बांधलीच नाही. परिणामी धरणात पाणी साठवले नाही आणि पाझरलेही नाही. यामुळे पाझर तलावाच्या मुळ उद्देशालाच बगल मिळाली. बांधकामाचा पूर्ण खर्च कागदोपत्री दाखवून त्याची उचल झाली. येथे पाणी पाझरले नाही, पण पैसा मात्र जिरला, असे गावात बोलले जात आहे.
सध्या तलावात ओव्हरफ्लोची सिंमेटची भिंत बांधली नसल्यामुळे पाणी तलावात थांबत नाही. तलाव परिसरात सर्वत्र झाडे झूडपे वाढली असून ज्यांनी जमीन दिली होती त्यापैकी काही शेतकरी सध्या शेती करीत आहेत. त्यांच्याा सातबारावर शेती तलावात गेल्याची नोंद आहे.
दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी व विहिरीची पातळी खोल जात असल्यामुळे पाझर तलावाचे अपुर्ण राहिलेले काम दुसऱ्या कोणत्याही शासकीय योजनेतर्फे पूर्ण करण्यात यावे. म्हणजे तलावात पाणी साचून, झिरपून पाण्याची पातळी वाढेल अशी गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

तलावाचे काम पूर्ण करण्याची मागणी
४अर्ध्यावर सोडलेले या पाझर तलावाचे काम त्वरीत सुरू करण्यासाठी बोंदरठाण्याचे सरपंच सुनील चौधरी, माजी सरपंच नेत्राम गाडगे, टिकाराम चौधरी (राजणी), ज्ञानेश्वर हिंगवे यांनी वर्धा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून या पाझर तलावातील गाळ काढून दुरूस्ती करण्यासाठी लेखी निवेदन दिले आहे. मधल्या काळात बजाज फाऊंडेशनने दुरूस्तीकाम करण्याचे स्वीकारले होते. मात्र याकरिता १५ टक्के लोकसहभाग गावकऱ्यांनी भरावा अशी अट घातल्याने काम पुढे जाऊ शकले नाही.

अधिग्रहीत जमिनीवर शेती सुरू
४तलावाकरिता परिसरातील १० शेतकऱ्यांची ५० एकर जमीन अधिग्रहीत करण्यात आली; मात्र तलाव पुर्णत्त्वास गेला नाही. यामुळे या भागातील शेतकरी त्याच जमिनीवर आता शेती करीत आहेत. जमीन अधिग्रहणाची रक्कमही मिळाली आणि त्या जमीनही, असा दुहेरी लाभ या शेतकऱ्यांना मिळाल्याची चर्चा परिसरात आहे.

हा तलाव १९७२ मध्ये झाला आहे. त्याला आज बराच काळ झाला आहे. असा तलाव झाल्याची कुठलीही माहिती नाही. तसे कधी पाहण्यातही गेले नाही. यामुळे असा तलाव कधी झाला हे सांगता येणे शक्य नाही. मात्र आता माहिती मिळाली आहे, तशी चौकशी करता येईल.
- बी. डब्ल्यू. यावले, गटविकास अधिकारी, कारंजा (घा. )

Web Title: Bondarthana Pazhar Lake Government Dumpery disappeared