उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील कुंदरकी या छोट्याशा गावातून न्यूयॉर्कच्या उत्तुंग इमारतींपर्यंत पोहोचण्याचा प्रवास एखाद्या चित्रपटासारखा वाटतो. पण इल्मा अफरोजसाठी हा प्रवास संघर्षमयी होता. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपलं. आपल्या मातीबद्दल आणि ज्या मुलांकडे शिक्षणाची साधनं नाहीत, अशा गरीब मुलांसाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा इल्माच्या मनात होती. एका शेतकऱ्याची मुलीचा हा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया...
इल्मा अफरोजचा जन्म मुरादाबादमधील कुंदरकी येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांनी तिला साधेपणा आणि कष्टाचे धडे दिले, परंतु जेव्हा इल्मा फक्त १४ वर्षांची होती, तेव्हा वडिलांचं कॅन्सरमुळे निधन झालं. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि १२ वर्षांचा मुलगा व इल्मा यांच्या संगोपनाची जबाबदारी आईच्या खांद्यावर आली. त्या काळात इल्माने शेतात राबून कष्ट केलं. आव्हानांच्या त्या काळात कोणीही कल्पना केली नव्हती की, मुरादाबादमधील एका छोट्याशा गावातील ही मुलगी एक दिवस जगातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये आपला ठसा उमटवेल.
आईने केला स्वतःच्या सुखाचा त्याग
समाजातील जुन्या रूढी आणि संकुचित विचारांना बाजूला सारून इल्माच्या आईने एक धाडसी निर्णय घेतला. ज्या समाजात मुलींच्या लग्नासाठी हुंड्याचे पैसे जमा केले जातात, तिथे इल्माच्या आईने आणि त्यांच्या लहान भावाने स्वतःच्या सुखाचा त्याग केला. त्यांनी आपली सर्व पुंजी आणि संसाधनं इल्माच्या उच्च शिक्षणावर खर्च केली. इल्मा आजही आपल्या आईला जगातील सर्वात धाडसी महिला मानते, जिने आपल्या मुलीची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. कुटुंबाच्या या अढळ विश्वासाने इल्माला प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद दिली.
भारतात परतण्याचा मोठा निर्णय
इल्माच्या बुद्धिमत्तेने तिला दिल्लीच्या प्रसिद्ध सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला, जिथे तिने गांधीजींचे विचार समजून घेतले. त्यानंतर तिची निवड 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी'मध्ये झाली, जिथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणांनंतर ती न्यूयॉर्कच्या मॅनहट्टनमध्ये गेली आणि तिथे आलिशान जीवन जगू शकली असती. पण मॅनहट्टनची स्कायलाईन पाहताना तिला नेहमी गांधीजींचा तो संकल्प आठवायचा—'प्रत्येक डोळ्यातील अश्रू पुसणं'. तिला जाणवलं की, त्यांच्या शिक्षणाचा खरा फायदा आपल्या देशातील लोकांनाच झाला पाहिजे. त्यानंतर तिने परदेशातील सुख सोडून भारतात परतण्याचा मोठा निर्णय घेतला.
'होप' नावाचं नेटवर्क केलं सुरू
२०१७ मध्ये इल्मा अफरोजने यूपीएससी परीक्षेत २१७ वा रँक मिळवला आणि IPS साठी निवड झाली. हिमाचल प्रदेश केडर मिळालं, परंतु तिचं ध्येय केवळ गुन्हेगारांना पकडणं नव्हतं. इल्माने आपल्या कुंदरकी गावात 'होप' (Hope) नावाचं नेटवर्क सुरू केलं आहे, जे वंचित आणि गरीब मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतं. वडिलांचं कॅन्सरमुळे निधन होण्यापासून आणि शेतात काम करण्यापासून ते आयपीएस अधिकारी बनण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास कोट्यवधी तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
