आर्वीत आगडोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 05:00 AM2021-05-14T05:00:00+5:302021-05-14T05:00:03+5:30

येथील पोलीस स्टेशनमध्ये रात्रीला कर्तव्यावर असलेले राहुल देशमुख यांना तहसील कार्यालय परिसरातील ट्रेझरी कार्यालयातून आगीचे लोळ निघताना दिसले. त्यांनी लागलीच घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आग धुमसत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कर्तव्यावर असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी ताबडतोब अधिकाऱ्यांना फोन करुन अग्निशमन दलालाही पाचारण केले.

Arvit Agdomb | आर्वीत आगडोंब

आर्वीत आगडोंब

Next
ठळक मुद्देतहसील परिसरात धावाधाव : ३५ लाखांच्या नुकसानीचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : शहर साखर झोपेत असताना गुरुवारी पहाटे २.३० च्या सुमारास तहसील कार्यालय परिसरातील इमारतीमध्ये चांगलाच आगडोंब उठला. तब्बल सात तास चाललेल्या या आगीत दुय्यम निबंधक कार्यालय, नायब तहसीलदार कार्यालय, ट्रेझरी कार्यालयातील रेकॉर्ड रुम आणि संजय गांधी निराधार योजना कार्यालयातील शासकीय दस्तावेजासह साहित्याची राखरांगोळी झाली. यात जवळपास ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
 येथील पोलीस स्टेशनमध्ये रात्रीला कर्तव्यावर असलेले राहुल देशमुख यांना तहसील कार्यालय परिसरातील ट्रेझरी कार्यालयातून आगीचे लोळ निघताना दिसले. त्यांनी लागलीच घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आग धुमसत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कर्तव्यावर असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी ताबडतोब अधिकाऱ्यांना फोन करुन अग्निशमन दलालाही पाचारण केले. या कार्यालयात दस्तावेज असल्याने आगीने अल्पवधीतच रौद्ररुप धारण केले. 
येथील नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीसमोर त्यांचे प्रयत्न कमी पडू लागल्याने आष्टी, देवळी व पुलगाव येथील अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागली.
 या इमारतीवर टिनपत्र्याचे छत असल्याने पाण्याचा मारा करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे गजराज बोलावून त्या टिना काढण्यासोबत भिंतीही पाडल्या. तेव्हा कुठे ४ अग्निशमन बंब आणि १८ टँकरच्या साहाय्याने पाण्याचा मारा करुन सात तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळविले. 
या आगीत २० संगणक संच, सर्व टेबल-खुर्च्या, आलमारी यासह इतर साहित्य आणि शासकीय रेकॉर्डची  राखरांगोळी झाली. उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, ठाणेदार संजय गायकवाड, नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सवालाखे, उपमुख्याधिकारी रणजित पवार, साकेत राऊत, नायब तहसीलदार विनायक मगर, कदम आदींसह पोलीस, महसूल व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळताच आमदार दादाराव केचे, माजी आमदार अमर काळे यांनी भेट देऊन पाहणी केली. 
 

येथील या कार्यालयामधील रेकॉर्ड जळाला
येथील नायब तहसीलदार यांच्या कार्यालयातील संगणक संच, रोजगार हमी योजनेचे सर्व कागदपत्र जळून राख झाले. सामान्य आस्थापना शाखेतील प्रस्तुतकार विभागाचे सर्व रेकार्ड व सेवा पुस्तिका, संगणक संच तसेच  खरांगणा सर्कलचे संपूर्ण अर्धन्यायिक प्रकरणे, आजपर्यंतचा संपूर्ण रेकॉर्डही जळाला. तर प्रस्तुतकार आर्वी, वाढोना सर्कलमधील संपूर्ण रेकॉर्ड, अर्धन्यायिक प्रकरणे आणि नैसर्गिक आपत्ती विभागातील सर्व रेकॉर्डही जळाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या कर्मचाऱ्यांचे सहकार्य ठरले मोलाचेेेे... 
या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता अग्निशमन दलाच्या चमूने सात तास मोठी मेहनत घेतली. त्यामध्ये आर्वी अग्निशमन दलाचे सुनील आरीकर, नरेंद्र मानकर, धीरज राणे, शिवा चिमोटे, नरेश आखरे, बावनकर, नीलेश गिरडकर, आष्टीचे नरेंद्र कदम, निखिल वैद्य, पुलगाव येथील निखिल लाटे, दुर्वास गायकी, संदीप अजमिरे, कुणाल गणवीर, देवळीचे ओंकारेश्वर मुळे, रंजित चापेकर, अक्षय क्षीरसागर यांचा समावेश आहे. 

 

आर्वी तहसील कार्यालयाच्या दक्षिणेकडील इमारतीला रात्री २.३० ते ३ वाजतादरम्यान आग लागल्याची माहिती मिळाली. लगेच घटनास्थळी जाऊन आर्वी, पुलगाव, देवळी, आष्टी येथील अग्निशमन यंत्रणेला पाचारण केले. सकाळी १० वाजता ही आग आटोक्यात आली असून आगीचे कारण कळू शकले नाही. विद्युत निरीक्षक याची तपासणी करीत असून त्यांचा अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होईल. या आगीत मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड आणि साहित्य जळाले. 
- विद्यासागर चव्हाण, तहसीलदार, आर्वी. 

 

Web Title: Arvit Agdomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग