पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 19:07 IST2025-10-20T19:04:22+5:302025-10-20T19:07:51+5:30
Uttar Pradesh Love Story: पुतण्याने संबंध पुढे चालू ठेवण्यास नकार दिल्यावर दोन मुलांच्या आईने पोलिसांसमोरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील पिसावा पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली . पुतण्याने संबंध पुढे चालू ठेवण्यास नकार दिल्यावर दोन मुलांच्या आईने पोलिसांसमोरच ब्लेडने स्वतःच्या हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला. ही घटना कुतुब नगर पोलीस स्टेशनमध्ये घडली.
दिल्लीची रहिवासी असलेली पूजा मिश्रा हिचे गाझियाबादमध्ये काम करणाऱ्या ललित कुमार मिश्रा यांच्याशी लग्न झाले. ललित यांनी त्यांचा पुतण्या आलोक मिश्रा याला मदतीसाठी बोलावले असता, पूजा आणि आलोक यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. हे संबंध पतीला समजल्यानंतर आलोकला घरातून काढून टाकण्यात आले. मात्र, त्यानंतर पूजा तिच्या दोन मुलांना सोडून आलोकसोबत बरेलीला गेली. बरेलीत सुमारे सात महिने ते एकत्र राहिले. आलोक ऑटो चालवत असे. या दरम्यान दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि आलोक त्याला सोडून सीतापूर जिल्ह्यातील मढिया या त्याच्या मूळ गावी परतला.
आलोक आपल्याला सोडून जात असल्याचे पाहून पूजा देखील सीतापूरला पोहोचली आणि तिने हे प्रकरण सोडवण्यासाठी पिसावा पोलीस स्टेशन परिसरातील कुतुब नगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. पोलिसांनी या दोघांना बोलावून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आलोक मिश्रा याने पूजासोबतचे संबंध पुढे चालू ठेवण्यास स्पष्टपणे नकार दिला. पुतण्याने संबंध तोडल्याचा निर्णय ऐकताच पूजा मिश्राने ब्लेड काढून स्वतःच्या हाताची नस कापली. या घटनेमुळे पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ पूजा मिश्रा हिला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असून, तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.