"जो रामाचा नाही, तो कोणाचाच नाही, मधुबनीला घुसखोरांचे लॉन्चिंग पॅड होऊ देऊ नका", आदित्यनाथ यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 19:54 IST2025-11-10T19:52:48+5:302025-11-10T19:54:07+5:30
Yogi Adityanath News: योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस व राजदला 'बिहारच्या गौरवशाली इतिहासाला कलंक लावणारे' असल्याचे म्हटले.

"जो रामाचा नाही, तो कोणाचाच नाही, मधुबनीला घुसखोरांचे लॉन्चिंग पॅड होऊ देऊ नका", आदित्यनाथ यांचे आवाहन
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मधुबनी जिल्ह्यातील गांधी नगर येथे झालेल्या सभेत काँग्रेस व राजदवर जोरदार टीका केली. माता जानकीच्या पवित्र भूमीला कोटी-कोटी प्रणाम अशी भाषणाची सुरूवात करत योगी म्हणाले, “ही ती भूमी आहे, जिच्यावर नालंदासारखी शिक्षणसंस्था उभी राहिली, पण काही लोकांनी पुन्हा या भूमीला अराजकतेकडे ढकलण्याचा प्रयत्न केला आहे.”
योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस व राजदला 'बिहारच्या गौरवशाली इतिहासाला कलंक लावणारे' असल्याचे म्हटले. "महा आघाडीने जातीयतेच्या नावावर समाजात दुफळी तयार केली आणि माफियांना संरक्षण दिलं. त्यामुळे बिहार मागे राहिला. तरुण आणि शेतकरी दयनीय अवस्थेला पोहोचले. हेच लोक पुन्हा बिहारमध्ये जंगलराज आणू इच्छित आहेत. याला थांबवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे एनडीए", अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.
एनडीएमध्ये प्रत्येकाचा सन्मान – मुख्यमंत्री आदित्यनाथ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "नालंदाने जगाला ज्ञान दिले, पण काँग्रेस-राजदने त्या भूमीला कलंकित केले. बहिणी-लेकी आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेला तडा देणारे हेच लोक आहेत. मधुबनी पेंटिंग, साहित्यिक परंपरा आणि स्थानिक संस्कृतीचा सन्मान आहे. या परंपरांचा सन्मान फक्त एनडीएच करत आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केलं.
“माफियांसाठी बुलडोजर, गरिबांसाठी हवेली”
आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील कायदा-सुव्यवस्थेचे उदाहरण देत सांगितले की, "जिथे माफियांच्या संपत्तीवर बुलडोजर चालला, त्या जागेवर गरिबांसाठी घरे उभारली गेली. जर कोणी व्यापारी, गरीब किंवा मुलींच्या डोळा ठेवला, तर त्याचं यमराजाच्या घरी जाण्याचं तिकीट पक्कं आहे. एनडीएचे सरकार शांतता आणि विकासाचे संतुलन राखू शकते.”
"जो रामचा नाही, तो कोणाचाच नाही"
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिरासाठी झालेल्या आंदोलनाचा उल्लेख करत काँग्रेस, राजद आणि समाजवादी पार्टी यांना रामद्रोही म्हटलं. "ज्यांनी रामलल्लाचा विरोध केला, त्यांना पुन्हा सत्तेत येऊ देऊ नका. जो रामाचा नाही, तो कोणाचाच नाही. अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रसाद प्रकल्प यामुळे सांस्कृतिक मूल्यांना सन्मान मिळाला आहे. आता सीतामढीत माता जानकी मंदिराचे काम सुरू आहे. ही आस्थेच्या सन्मानाची खूण आहे.”
"मधुबनीला घुसखोरांचे केंद्र होऊ देऊ नका"
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "हे क्षेत्र संवेदनशील आहे. राजद-काँग्रेस बाहेरील लोकांना घुसवून स्थानिकांचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न करत आहेत. मत देताना विकास, सुरक्षा आणि आस्था यांचा विचार करा. जर काँग्रेस-राजद पुन्हा सत्तेत आली, तर पुढील पिढ्या आपल्याला शाप देतील.”