सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 09:54 IST2025-11-18T09:53:53+5:302025-11-18T09:54:12+5:30
Uttar Pradesh Crime News: सुनेसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असलेल्या मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बापानेच पोटच्या पोराची डोक्यात फावड्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.

सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
सुनेसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असलेल्या मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बापानेच पोटच्या पोराची डोक्यात फावड्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथील नांगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ नोव्हेंबर रोजी उसाच्या शेतामध्ये सौरभ तोमर नावाच्या तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाच्या स्थितीवरून हा नैसर्गिक मृत्यू नसल्याचे स्पष्टपणे दिसत होते. दरम्यान, मृत सौरभ याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीमध्ये तिने सौरभचे वडील सुभाष तोमर यांच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपास आणि ग्रामस्थांनी दिलेल्या जबाबांमधून पोलिसांना आरोपीबाबत माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुभाष तोमर याला अटक केली. तसेच त्याने दिलेल्या माहितीनुसार हत्येसाठी वापरलेलं फावडं आणि एक बेकायदेशीर कट्टा जप्त केला. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपी सुभाष याने धक्कादायक कबुली दिली. त्याने सांगितले की, त्याचे त्याच्या सुनेसोबत अनैतिक संबंध होते. तसेच मृत सौरभ याला याबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते.
दरम्यान, १२ नोव्हेंबर रोजी सौरभ शेतात काम करत असताना सुभाष याने त्याला उसाच्या शेतात बोलावून घेतले. तसेच कट्ट्यामधून त्याच्यावर गोळीबार केला. मात्र सौरभ त्यात बचावला. मात्र सुभाष याने संधी साधून बाजूला असलेल्या फावड्याने सौरभच्या डोक्यात जोरात वार केले. त्यात सौरभचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर सुभाष याने सौरभ हा बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आणि त्याचा शोध घेत असल्याचं नाटक रचलं. मात्र हे नाटक फार काळ टिकलं नाही. पोलिसांसमोर अखेर त्याचं पितळ उघडं पडलं आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.