“आमच्या योजना तुष्टीकरणावर नाही, संतुष्टीकरणावर आधारित”; योगी आदित्यनाथांनी विरोधकांना सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2025 11:34 IST2025-08-08T11:30:15+5:302025-08-08T11:34:37+5:30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुरादाबादमध्ये ७९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अटल निवासी शाळेचे लोकार्पण करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

uttar pradesh cm yogi adityanath said our plans are based on contentment not appeasement | “आमच्या योजना तुष्टीकरणावर नाही, संतुष्टीकरणावर आधारित”; योगी आदित्यनाथांनी विरोधकांना सुनावले

“आमच्या योजना तुष्टीकरणावर नाही, संतुष्टीकरणावर आधारित”; योगी आदित्यनाथांनी विरोधकांना सुनावले

CM Yogi Adityanath News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुरादाबादमध्ये ७९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अटल निवासी शाळेचे लोकार्पण करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि स्वातंत्र्यदिनाच्या मुरादाबादच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. राज्यातील सर्व भगिनींना ८, ९, १० ऑगस्ट रोजी रोडवेज बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देण्याची घोषणा केली. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, तुष्टीकरणाचे राजकारण करून सत्तेत आलेले लोक आज कुठेही दिसत नाहीत. हे लोक समाजासोबत, भावी पिढीसोबत उभे राहू शकत नाहीत. भाजपाच्या योजना तुष्टीकरणावर आधारित नाहीत, तर संतुष्टीकरणावर आधारित आहेत. या योजना कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतात, हे नमूद करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, एक काळ असा होता की, तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्यांसाठी सत्ता फक्त एका दुकानाप्रमाणे होती. त्यांनी शिक्षणाला कॉपीयुक्त, अराजकता आणि जातीयवादाचे अड्डे बनवले. पण आज तेच लोक संतुष्टीकरणाबाबत कळवळा येत असल्याचे भासवत आहेत. आमचे सरकार तुष्टीकरणाचे नाही, तर संतुष्टीकरणाच्या मार्गावर चालते. म्हणूनच आज जनतेचा विश्वास भाजपावर आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. 

श्रमिकांच्या पैशांची लूट थांबली 

रक्षाबंधनाच्या आधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे शिक्षण केंद्र मुरादाबाद विभागातील मुलांना आणि कामगार कुटुंबांना समर्पित करताना अटलजींच्या स्मृतीस समर्पित एक आदर्श शिक्षण मंदिर म्हटले. ७९ कोटी रुपये खर्चून बांधलेली ही शाळा अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षात सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून त्यांचे आदर्श आणि मूल्ये नवीन पिढीमध्ये स्थापित करता येतील. योगी आदित्यनाथ म्हणाले की, ही शाळा केवळ शिक्षणाचे केंद्र नाही तर संस्कृती, शिस्त आणि स्वावलंबनाचे स्रोत बनेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीओसी निधीच्या अर्थपूर्ण वापरासाठी दिलेल्या सूचनांचा हवाला देत ते म्हणाले की, आता हा पैसा कामगारांच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च केला जात आहे. पूर्वीच्या सरकारांमध्ये हा पैसा लूटमार आणि भ्रष्टाचाराचे साधन बनला होता.

श्रमिकांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्चही सरकार उचलेल

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत १८ अटल निवासी शाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. ज्या १८,००० हून अधिक कामगार आणि अनाथ मुलांना पूर्णपणे मोफत, दर्जेदार शिक्षण देत आहेत. त्यांनी हे शिक्षणाप्रती सरकारची अढळ वचनबद्धता असल्याचे वर्णन केले. भाजपा सरकारने फसवणूक दूर करून शिक्षणात प्रामाणिक व्यवस्था लागू केली आहे. ज्यामुळे उत्तर प्रदेश आता शिक्षण क्षेत्रात देशात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या शाळांमध्ये आधुनिक शिक्षण तंत्रे, वरिष्ठ-कनिष्ठ वसतिगृहे, संपूर्ण निवासी सुविधा, खेळ, प्रयोगशाळा आणि कौशल्य विकासासाठी व्यापक व्यवस्था आहे. बारावीनंतर, वैद्यकीय असो किंवा आयआयटी, उच्च शिक्षणाचा संपूर्ण खर्चही सरकार उचलेल, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

समाजवादी पक्षाने श्रीगणेशाचा अपमान केला

समाजवादी पक्षावर टीका करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, आज समाजवादी पक्षाला अचानक पीडीएची चिंता वाटू लागली आहे. भूतकाळात त्यांच्याच सरकारमध्ये शिक्षण क्षेत्रात ज्या प्रकारची वागणूक घडली ती कोणापासूनही लपलेली नाही. कल्याण सिंह यांच्या सरकारमध्ये जेव्हा "जी फॉर गणेश" शिकवले जात होते, तेव्हा समाजवादी पक्षाने त्याला विरोध केला आणि म्हटले की "जी फॉर गाढव" असायला हवे. भाजपा सरकार मुलांना भारतीय संस्कृती आणि मूल्यांशी जोडण्याचे काम करत असताना, समाजवादी पक्षाने श्रीगणेशाचा अपमान केला. त्यांच्या कार्यकाळात, राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर वाईट परिणाम झाला. शिक्षक भरती वेळेवर झाली नाही. शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केले गेले नाहीत. घराणेशाही आणि जातीच्या राजकारणामुळे संपूर्ण प्रशासकीय आणि शैक्षणिक व्यवस्था कोलमडली होती. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काही ना काही माफिया सक्रिय होते. संपूर्ण राज्य अराजकता आणि दंगलींच्या आगीत ढकलले गेले. त्यांनी कॉपी करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क मानला. त्यांना फसवणूक करून, त्यांनी येथील तरुण पिढीच्या भविष्याशी खेळ केला, या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी हल्लाबोल केला. 

उत्तर प्रदेशला त्याच्या वारशाचा, विकासाचा आणि शिक्षणाचा अभिमान 

मुख्यमंत्री योगी म्हणाले की, उत्तर प्रदेश केवळ विकासाच्या नवीन उंची गाठत नाही, तर त्याच्या समृद्ध वारशाचाही अभिमान आहे. उत्तर प्रदेश वारसा, विकास, शिक्षण आणि 'एक जिल्हा एक उत्पादन' यासारख्या मोहिमांसह स्वतःची ओळख निर्माण करत आहे. 'एक जिल्हा, एक वैद्यकीय महाविद्यालय' अंतर्गत, आरोग्य शिक्षणाच्या क्षेत्रातही राज्य एक नवीन उदाहरण म्हणून उदयास आले आहे. समाजवादी पक्षाला शिक्षणाचे मॉडेल पाहायचे असेल तर अटल निवासी शाळेकडे पाहा. ऑपरेशन कायाकल्प अंतर्गत १.५४ लाख जीर्ण शाळांना नवरुप देण्यात आले. आता मुख्यमंत्री अभ्युदय विद्यालयाच्या योजनेअंतर्गत ५७ जिल्ह्यांमध्ये शिक्षणाचे मॉडेल देखील उभारले जात आहेत, असे प्रतिपादन योगी आदित्यनाथ यांनी केले.

 

Web Title: uttar pradesh cm yogi adityanath said our plans are based on contentment not appeasement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.