"जनतेसोबत गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही"; सरकारी कर्मचाऱ्यांना CM योगी आदित्यनाथ यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 19:17 IST2025-09-08T19:09:47+5:302025-09-08T19:17:41+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनता दर्शन कार्यक्रमात नागरिकांच्या समसम्यांचे निवारण केले.

"जनतेसोबत गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही"; सरकारी कर्मचाऱ्यांना CM योगी आदित्यनाथ यांचा इशारा
Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी 'जनता दर्शन' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यादरम्यान त्यांनी राज्यभरातील पीडितांच्या तक्रारी ऐकल्या आणि कारवाईचे आश्वासन दिले. जनता दर्शनाला ५० हून अधिक नागरिकांनी हजेरी लावली होती. यावेळी सहारनपूरमधील एका महिलेने सांगितले की, तिच्याकडे रेशन कार्ड नव्हते. रेशन घ्यायला गेल्यावर रेशन विक्रेत्याने तिच्याशी गैरवर्तन करायचा. यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. प्रत्येक सरकारी सेवकाने जनतेशी योग्य वर्तन करायला हवं, कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन सहन केले जाणार नाही असा इशारा यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला.
सोमवारी झालेल्या 'जनता दर्शन' कार्यक्रमात बहुतेक तक्रारी या जमिनीच्या वादांशी संबंधित होत्या. प्रयागराज येथील एका सीआरपीएफ जवानानेही जमिनीशी संबंधित एका प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांसमोर आपला मुद्दा मांडला. यावर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला हे प्रकरण लवकर सोडवण्याचे निर्देश दिले. शामली येथील एका महिलेनेही आपली तक्रार मांडली. महिलेने सांगितले की तिचा पती आसाममध्ये तैनात आहे. तिने प्रयागराजमध्ये जमीन खरेदी केली आहे, पण ती ताब्यात घेण्यात अडचणी येत आहेत. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडित महिलेचे निवेदन घेतलं आणि कारवाईचे निर्देश दिले.
जनता दर्शनमध्ये आलेल्या मंजू देवी त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की त्यांचे अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारांसाठी आर्थिक मदत करावी. यावर मुख्यमंत्र्यांनी, सरकार प्रत्येक गरजू रुग्णाला आर्थिक मदत करत आहे, तुम्हीही रुग्णालयाकडून अंदाजपत्रक तयार करून पाठवा. तुमच्या उपचारांचा खर्च सरकार करेल, असं आश्वासन दिलं.
मुख्यमंत्री योगींच्या 'जनता दर्शन'ला दिव्यांगानीही हजेरी लावली होती. गाजीपूर येथील दिव्यांग उधम यादव यांनी मुख्यमंत्र्यांना पेन्शन, आयुष्मान कार्ड, हातपंप आणि घरकुल लाभ मिळवण्यासाठी अर्ज दिला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना त्यांच्या समस्या सोडवण्याचे आणि त्यांना सरकारी योजनांचे लाभ देण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी उधम यादव यांना इलेक्ट्रॉनिक चालण्याची काठी देखील दिली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी पालकांसोबत आलेल्या मुलांचेही कौतुक केलं. योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आपलेपणाची भावना दिली. काही मुलांच्या शिक्षणाचीही त्यांनी विचारपूस केली. मुख्यमंत्री योगींनी चॉकलेट आणि टॉफी वाटल्या आणि मुलांना चांगले शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्य घडवण्याचे आशीर्वाद दिले.