महिलेच्या सांगण्यावरुन बनवला 'टाईम बॉम्ब', आरोपी जावेदचे नेपाळ कनेक्शन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 22:07 IST2024-02-16T22:04:42+5:302024-02-16T22:07:11+5:30
या घटनेमागचा सूत्रधार कोण, याचा शोध आयबी, एटीएस आणि इंटेलिजन्सची पथके घेत आहेत.

महिलेच्या सांगण्यावरुन बनवला 'टाईम बॉम्ब', आरोपी जावेदचे नेपाळ कनेक्शन...
Uttar Pradesh:उत्तर प्रदेश STF च्या पथकाने मुझफ्फरनगर जिल्ह्यातून जावेद नावाच्या व्यक्तीला टाइम बॉम्बसह अटक केली आहे. तो मूळ नेपाळचा असल्याची माहिती समोर आळी आहे. आता चौकशीत त्याने अनेक खुलासे केले आहेत. एका महिलेच्या सांगण्यावरुन बॉटल टाईम बॉम्ब बनवल्याची माहिती जावेदने दिली आहे.
महिलेलाही अटक
यूपी एसटीएफ टीमने जावेदसह आणि एका महिलेलाही अटक केली आहे. इमराना असे त्या महिलेचे नाव आहे. त्या महिलेच्या सांगण्यावरुन जावेदने टाइमबॉम्ब तयार केला होता. तो बॉम्ब बनवण्याचा मास्टरमाईंड असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या ताब्यातून 4 टायमर बॉटल बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. यूपी एसटीएफने आरोपीकडून चार बॉम्ब, आयईडी, गन पावडर 999, लोखंडी गोळ्या, कापूस, पीओपी आदी साहित्य जप्त केले आहे.
जावेदच्या माहितीनुसार, इमरानाने जावेदला बॉटल बॉम्ब तयार करण्यासाठी 10,000 रुपये अॅडव्हान्स दिले होते आणि बॉम्ब दिल्यानंतर उर्वरित 40,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. जावेदने काका मोहम्मद अर्शी याच्याकडून बॉम्ब बनवण्याची कला शिकल्याचेही समोर आले आहे. अर्शी मुझफ्फरनगरच्या मिमलाना रोडवरील कोतवाली नगर परिसरात राहतो. प्रत्यक्षात तो फटाके बनवण्याचे काम करतो.
दिल्लीपासून लखनौपर्यंत खळबळ
टायमर बॉटल बॉम्ब सापडल्याने दिल्ली ते लखनौपर्यंतच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे, पहिल्यांदाच पश्चिम यूपीमध्ये टायमर बॉटल बॉम्बचा कट उघड झाला आहे. यामागे कोणती दहशतवादी संघटना आहे, आणि कोण जावेदच्या नेटवर्कशी जोडलेले आहे, याचा शोध आयबी, एटीएस आणि इंटेलिजन्सच्या पथक घेत आहेत.