प्रत्येक खेळाडू समाजाचा हिरो अन् राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 14:19 IST2025-08-30T13:34:54+5:302025-08-30T14:19:30+5:30
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान

प्रत्येक खेळाडू समाजाचा हिरो अन् राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
प्रत्येक खेळाडू हा समाजासाठी एक हिरो असतो. आपण सर्वांनी खेळाडूप्रमाणे शिस्त, समन्वय आणि त्यांच्याप्रमाणे राष्ट्र निष्ठेसह जीवनात पुढे जाणे आवश्यक आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. २९ ऑगस्ट रोजी देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित खास कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या उत्तर प्रदेशातील ८८ खेळाडूंना रोख पारितोषिके प्रदान केली तसेच सहाय्यक क्रीडा प्रशिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. माजी ऑलिंपियन, अर्जुन पुरस्कार विजेते आणि नॅशनल गेम्समध्ये पदक जिंकलेल्या खेळाडूंनाही या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. विविध जिल्ह्यांमध्ये उभारल्या जाणाऱ्या क्रीडा पायाभूत सुविधांचा लोकार्पण सोहळाही पार पडला.
रोख बक्षीसांचा तपशील
स्पर्धा | सुवर्ण | रौप्य | कांस्य |
ऑलिंपिक | ६ कोटी | ४ कोटी | २ कोटी |
आशियन गेम्स | ३ कोटी | १.५ कोटी | ७५ लाख |
कॉमनवेल्थ गेम्स | १.५ कोटी | ७५ लाख | ५० लाख |
वर्ल्ड चॅम्पियनशिप | १.५ कोटी | ७५ लाख | ५० लाख |
नॅशनल/स्टेट गेम्स | ६ लाख | ३ लाख | २ लाख |
ध्यानचंद यांची जादू अन् हॉकीचा जगभरात डंका
या कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की; “मेजर ध्यानचंद यांचे नाव घेतले की, प्रत्येक भारतीयाला हॉकीची स्टिक डोळ्यासमोर येते. त्यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ या तिन्ही ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदके जिंकून भारतीय हॉकीला जागतिक ओळख मिळवून दिली. देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार “मेजर ध्यानचंद खेळरत्न” त्यांच्या नावाने समर्पित केला गेला, हे उत्तर प्रदेशासाठी अभिमानास्पद आहे. मेरठ येथील राज्यातील पहिल्या क्रीडा विद्यापीठाला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले असून याच सत्रापासून अभ्यासक्रम सुरू झाला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मोदींच्या नेतृत्वाखाली देशात क्रीडा क्षेत्रात नवी क्रांती
लखनौ येथील गोमतीनगर परिसरातील विजयंत खंड स्थित मोहम्मद शाहिद हॉकी स्टेडिमयवर खेळवण्यात आलेल्या स्पोर्ट्स हॉस्टेल विरुद्ध स्पोर्ट्स कॉलेज यांच्यातील हॉकीच्या लढतीचाही मुख्यमंत्र्यांनी आनंद घेतला. वेग उर्जा अन् टीम वर्क याचे उत्तम उदाहरण म्हणजे हॉकीचा खेळ असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खेलो इंडिया पासून फिट इंडिया मूव्हमेंटपर्यंत आणि खासदार/आमदार स्तरावरील स्पर्धांपर्यंत देशात क्रीडा क्षेत्रात नवी क्रांती घडली आहे, असे ते म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यात एक स्टेडियम अन् यूपीची हॉकी परंपरा
प्रत्येक विभागात एक क्रीडा महाविद्यालय स्थापन होत असून उत्कृष्टतेची केंद्रे विकसित केली जातील. माजी ऑलिंपियन व राष्ट्रीय पदक विजेत्यांना प्रशिक्षक बनवून नव्या प्रतिभांना संधी दिली जाणार आहे. गावपातळीवर खेळाचे मैदान, विकासखंडावर मिनी स्टेडियम आणि प्रत्येक जिल्ह्यात एक स्टेडियम उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उत्तर प्रदेशाने मेजर ध्यानचंद, के.डी.सिंह बाबू, मोहम्मद शाहिद आदी दिग्गज खेळाडू दिले आहेत. पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारे ललित उपाध्याय व राजकुमार पाल हे देखील याच मातीतले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
खासदार क्रीडा स्पर्धेबद्दलही दिली माहिती
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी खेळातील समर्पण ही तंदुरुस्तीची गॅरेंटी असल्याच्या गोष्टीवरही जोर दिला. याच पार्श्वभूमिवर १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान देशभर खासदार क्रीडा स्पर्धा होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. राज्यात खेळाडूंना सरकारी नोकऱ्यांमध्ये २ टक्के आरक्षण देण्यात आले असून आतापर्यंत ५०० खेळाडूंना संधी मिळाली आहे. विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पदक विजेत्यांना पारितोषिके व मानधन देऊन सन्मानित केले जात आहे.