सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:17 IST2025-08-30T18:16:53+5:302025-08-30T18:17:34+5:30

"जेकुणी राज्याची लोकसंख्या (डेमोग्राफी) बदलण्याचा प्रयत्न करतील, त्यांनाच पलायन करावे लागेल... विकास कामे बघून विरोधक हादरलेत, पंतप्रधानांसंदर्भातील आक्षेपार्ह वक्तव्यातून दिसतेय हताशा..."

SP-Congress hatched a conspiracy to change the demography of Sambhal, Hindus were deliberately targeted! Chief Minister Yogi Adityanath claims | सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा

सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा


समाजवादी पार्टी आणि  काँग्रेसच्या कार्यकाळात हिंदूंना ठरवून लक्ष्य करण्यात आले. तेव्हा, हिंदूंची लोकसंख्या कमी करून डेमोग्राफी बदलण्याचा कट रचण्यात आला. आज हे डबल इंजिनचे सरकार कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारची फुटीर राजकारण होऊ देणार नाही. जे कुणी राज्यातील डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करेल, त्याला स्वतःलाच पलायन करावे लागेल, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सपा आणि काँग्रेसवर थेट निशाणा साधला. त्यांनी शुक्रवारी प्रतापगड येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी, संभलमधील 2024 च्या हिंसाचारासंदर्भात आलेल्या न्यायिक आयोगाच्या अहवालाचा हवाला देत ते बोलत होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रतापगड येथील ५७० कोटी रुपयांच्या १८६ विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी प्रसंगी जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले, विकास कामे पाहून विरोधक भयभीत झाले आहेत. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची 'इंडिया आघाडी' प्रत्यक्षात 'अँटी इंडिया' आघाडी आहे. ही आघाडी भारताच्या स्वाभीमाशी खेळत आहे आणि जाती-धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करण्याचे काम करत आहे. त्यांना जेव्हा-जेव्हा सत्ता मिळाली, तेव्हा-तेव्हा त्यांनी माफियांना प्रोत्साहन दिले, गुंडगिरी केली आणि गरिबांचे हक्क ओरबडून घेतले. आता जनतेने त्यांना नाकारले आहे.

पंतप्रधानांवर अश्लील भाष्य म्हणजे, सूर्यावर थुंकण्यासारखे - मुख्यमंत्री
योगी म्हणाले, देश आणि राज्यातील विकासकामे पाहून विरोधक गडबडले आहेत. याच बरोबर, बिहारमधील अलिकडेच झालेल्या इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत मोतोश्रींवर करण्यात आलेल्या अश्लील भाष्यावर बोलताना योगी म्हणाले, अशा लोकांना राजकारणात स्थानच मिळायला नको. या लोकांनी समजून घ्यायला हवे की, भारताचे पंतप्रधान हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत आणि त्यांच्याविरुद्ध अपशब्द वापरणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. तो थुंका त्यांच्यावरच येईल. या वक्तव्यामुळे आज १४० कोटी भारतीयांना अपमानित झाल्यासारखे वाटत आहे. 

योगी पुढे म्हणाले, आता आपण समाधानाच्या माध्यमातून सक्षमीकरणाकडे वाटचाल करत आहोत, म्हणूनच ८ वर्षांत ६ कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत.

डबल इंजिन सरकारने माफिया राज संपवले - 
मुख्यमंत्री योगी म्हणाले, डबल इंजिन सरकारने आज माफिया राज संपवून राज्याला विकासाच्या मार्गावर आणले आहे. मागील सरकारांनी प्रत्येक जिल्ह्यात एक माफिया दिला होता, जो लूटमार करायचा, विकास योजना लुटायचा आणि गरिबांचे हक्क ओरबडून घ्यायचा. परंतु डबल इंजिन सरकारने माफिया राज संपवून एक जिल्हा एक उत्पादन (प्रोडक्ट) आणि एक जिल्हा एक वैद्यकीय महाविद्यालय दिले. एवढेच नाही तर, आज प्रतापगडच्या आवळ्याचे उत्पादन आता जगभर पोहोचत आहे, सोनेलाल पटेल मेडिकल कॉलेज उभे राहीले आणि गंगा एक्सप्रेसवेसारखे कनेक्टिव्हिटी प्रकल्प विकासाला गती देत ​​आहेत. प्रतापगड आज विकासाची नव-नवी उदाहरणे निर्माण करत आहे, असेही मुख्यमंत्री योगी म्हणाले.

Web Title: SP-Congress hatched a conspiracy to change the demography of Sambhal, Hindus were deliberately targeted! Chief Minister Yogi Adityanath claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.