सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 11:39 IST2025-08-26T11:37:36+5:302025-08-26T11:39:10+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथील गुरूद्वारामध्ये झालेल्या कार्यक्रमात शीखांचे दहावे गुरू गुरूगोविंद सिंग यांच्या कार्याला उजाळा दिला.

सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ
'आपल्या पूर्वजांचे शौर्य, त्यांचा पराक्रम आणि त्यांचे हौतात्म्य या गोष्टींचा विसर न पडू देणारा समुदाय, वंशच इतिहासामध्ये जिवंत राहतो. शीख गुरूंनी नेहमी सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यांचे शौर्य, त्याग आणि हौतात्म्य देशाच्या आत्म्यामध्ये आजही जिवंत आहे', असे गौरवोद्गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी काढले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ हे गोरखपूरमधील पेडलगंज येथील श्री गुरू सिंह गुरूद्वारामध्ये आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी पर्यटन विकास कामे, गुरूद्वारातील नवीन भवन आणि इतर विस्तारित कामाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी गुरूवाणीचे श्रवणही केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "शीख गुरूंची परंपरा प्रवाहित राहिलेली आहे. गुरु नानक देवजींपासून ते गुरू गोविंद सिंगजींपर्यंत, प्रत्येक गुरूंनी सनातन धर्माचे आणि देशाचे संरक्षण केले आहे. त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली."
"जेव्हा जेव्हा भारतीय संस्कृतीवर संकट आले, तेव्हा तेव्हा शीख गुरूंनी पुढे येऊन आणि आपले बलिदान देऊन तिचे रक्षण केले आहे. गुरू तेग बहादूरजींच्या ३५०व्या बलिदान वर्षाच्या निमित्ताने देशभरात कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत", असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.
चार सुपुत्रांच्या बलिदानाचा गौरवशाली इतिहास
मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले, "गुरू गोविंद सिंग महाराजांचे चार सुपुत्र बाबा अजित सिंग, बाबा जुझार सिंग, बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांचे बलिदान भारतीय इतिहासातील एक अभिमानाची घटना आहे. इस्लाम स्वीकारावा म्हणून त्यांना जेव्हा आमिष दाखवलं गेलं, पण त्यांनी शरणागती पत्करण्याऐवजी बलिदानाचा मार्ग निवडला. छोट्या सुपुत्राला भिंतीमध्ये गाडले गेले, तरीही ते धर्म आणि राष्ट्र रक्षणासाठी ठाम राहिले", असेही योगी आदित्यानाथ म्हणाले.